नवीन इमारत मंजूर, तरीही जुन्या इमारतीला लाखोंची मलमपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:03 AM2021-03-19T04:03:57+5:302021-03-19T04:03:57+5:30
लाडसावंगी : येथील जनावरांच्या दवाखान्यासाठी नवीन इमारतीला निधी मंजूर झालेला आहे. नवीन बांधकामाला सुरुवात करण्याऐवजी जुन्याच इमारतीला छोटी-छोटी डागडुजी ...
लाडसावंगी : येथील जनावरांच्या दवाखान्यासाठी नवीन इमारतीला निधी मंजूर झालेला आहे. नवीन बांधकामाला सुरुवात करण्याऐवजी जुन्याच इमारतीला छोटी-छोटी डागडुजी करून तीन लाखांचा निधी हडपण्याचा प्रकार सुरू आहे. केवळ मार्च एण्डअखेर मंजूर निधीची विल्हेवाट लावून पैसे हडपण्यासाठी हा गोरखधंदा जि.प. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.
लाडसावंगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यावर परिसरातील तीस गावांतील जनावरांचे आरोग्य अवलंबून आहे. विशेष म्हणजे लाडसावंगी परिसर डोंगराळ भाग असल्यामुळे या भागात पशुधनाची संख्या मोठी आहे. यावर प्रशासनाने जनावरांची संख्या पाहून लाडसावंगी गावात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीसाठी नुकताच ऐंशी लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, येथे अनुदान लाटण्यासाठी जि.प. अधिकाऱ्यांनी गुत्तेदाराच्या साहाय्याने जुन्या इमारतीची विनाकारण डागडुजी करून पैशांचा अपव्यय सुरू केला आहे. तब्बल तीन लाख रुपयांचा निधी यासाठी खर्च केला जात आहे. विशेष म्हणजे जुन्या इमारतीच्या भिंतीचे फ्लास्टर चांगल्या अवस्थेत असूनही ते काढून त्याजागी नाल्यातील मातीमिश्रित वाळू वापरून प्लास्टर केले जात आहे. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन कामाला निधी नसल्याचे कारणे दाखवून कामे पुढे ढकलली जात असताना प्रशासनाकडून हा गोरखधंदा केला जात आहे. जुन्या इमारतीची डागडुजी न करता नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कोट
लाडसावंगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी निधी मंजूर असून, या बांधकामासाठी दोन ते तीन वर्षे लागतील. शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी मागणी असल्याने जुन्या इमारतीची दुरुस्ती केली जात आहे.
-संजय येळीकर, अभियंता, जि.प. बांधकाम विभाग
फोटो :
लाडसावंगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे चांगले प्लास्टर काढून दुरुस्ती केली जात आहे.
180321\1616043874141_1.jpg
लाडसावंगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे चांगले प्लास्टर काढून दुरुस्ती केली जात आहे.