औरंगाबादच्या सुभेदारीत ‘व्हीव्हीआयपी’ सूटस्ची उभी राहणार नवी इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:58 AM2018-02-26T00:58:59+5:302018-02-26T00:59:03+5:30
सुभेदारी विश्रामगृह परिसरातील अॅनेक्स या व्हीआयपी कक्षालगत असलेल्या जागेत ६ कोटी रुपये खर्चातून ‘व्हीव्हीआयपी’ सूटस् असलेली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. पर्यावरण मैत्रभाव (इको फ्रेंडली) ग्रीनफिल्डच्या धर्तीवर ती इमारत बांधण्यात येणार असून, पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या इमारतीप्रमाणेच येथील इमारत बांधण्यात येणार आहे. बांधकाम विभागाने यासाठी आराखडा तयार केला असून, जिल्हा नियोजन समितीतून या कामासाठी निधी देण्यात येणार आहे.
विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सुभेदारी विश्रामगृह परिसरातील अॅनेक्स या व्हीआयपी कक्षालगत असलेल्या जागेत ६ कोटी रुपये खर्चातून ‘व्हीव्हीआयपी’ सूटस् असलेली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. पर्यावरण मैत्रभाव (इको फ्रेंडली) ग्रीनफिल्डच्या धर्तीवर ती इमारत बांधण्यात येणार असून, पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या इमारतीप्रमाणेच येथील इमारत बांधण्यात येणार आहे. बांधकाम विभागाने यासाठी आराखडा तयार केला असून, जिल्हा नियोजन समितीतून या कामासाठी निधी देण्यात येणार आहे.
या दशकामध्ये शहरात पर्यटक येण्याचे प्रमाण वाढते आहे, तसेच प्रादेशिक पातळीवर शासकीय बैठका होत आहेत. आगामी काळात सर्व शासकीय कार्यालयांचे संकुल लेबर कॉलनी परिसरात बांधण्याचे विभागीय प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियोजन आहे. सुभेदारी विश्रामगृहात सध्या असलेली व्यवस्था पुरेशी नाही. सर्व मिळून ४५ सूटस् तेथे आहेत. त्यामुळे चांगल्या सोयीची एक इमारत बांधण्याचा प्रस्ताव गेल्यावर्षी चर्चेला आला. विद्यमान परिसरात सभागृह नाही, त्यामुळे नवीन इमारती सुसज्ज असे सभागृह, पार्किंगची व्यवस्था असणार आहे.
अधीक्षक अभियंता म्हणाले
बेडरुम्स, किचन, हॉल, गॅलरी अशी किमान टू बीएचकेचा एक सूटस् असणार आहे. कॅबिनेट मंत्री आणि सचिव दर्जाचे अधिकारी व सर्वाेच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ठराविक पर्यटकांना येथे थांबता येईल. इतरांसाठी ते सूटस् उपलब्ध होणार नाहीत.
या इमारतीमध्ये मंत्री तथा सचिवांना बैठका घेण्यासाठी मोठा प्रशस्त हॉल (सभागृह) बांधण्यात येणार असून तो हॉल सुविधायुक्त असेल. सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहावी. विजेचा वापर कमी प्रमाणात होईल. तसेच सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणेदेखील या इमारतीत वापरण्याचा विचार सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले.