‘प्रॅक्टिकल’चा गोरखधंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:25 AM2017-11-10T00:25:17+5:302017-11-10T00:25:21+5:30
रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी स्वत: तयार करणे बंधनकारक असते. मात्र, विद्यार्थी संबंधित सत्राचे सर्व प्रात्यक्षिक झेरॉक्स सेंटर, डीटीपी दुकानातून खरेदी करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राम शिनगारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, पदविका, औषधनिर्माण, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या काही विषयांना ५० गुणांचे प्रॅक्टिकल (प्रात्यक्षिक) असते. हे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी स्वत: तयार करणे बंधनकारक असते. मात्र, विद्यार्थी संबंधित सत्राचे सर्व प्रात्यक्षिक झेरॉक्स सेंटर, डीटीपी दुकानातून खरेदी करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे प्रात्यक्षिक खरेदी करण्यासाठी मुंबई, पुणे येथीलसुद्धा अभियांत्रिकीचे विद्यार्थी औरंगाबादेत येत असल्याचे स्पष्ट झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा काही दिवसांनंतर होणार आहेत. या परीक्षेपूर्वी तीन विषयांना असणारे ५० गुणांचे प्रॅक्टिकल पूर्ण करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. यात विषयानुसार सर्किट, थेअरी, डायग्राम, इन्स्ट्रुमेंट, इनपुट, आऊटपुट, स्ट्रक्चर, पॉवर डायग्राम, अशा विविध प्रकारचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना लेखी स्वरुपात संबंधित महाविद्यालयांमध्ये तयार करून द्यावे लागते. यासाठी आवश्यक असलेल्या सूचना महाविद्यालयांतील प्राध्यापक विद्यार्थ्यांना देतात. हे प्रॅक्टिकल तयार करण्यासाठी नमुनासुद्धा देण्यात येतो. विद्यार्थी हाच नमुना झेरॉक्स सेंटर, डीटीपी दुकानदारांना देतात. त्यानुसार दुकानदार विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे रेडिमेड प्रॅक्टिकल देतात. या प्रॅक्टिकलचा दर हा प्रतिपेज ५ ते १२ रुपये याप्रमाणे आहे. हा दर पूर्वी ८ ते १५ रुपये होता. विद्यार्थ्यांना कोणतेही कष्ट न करता तीन विषयांचे रेडिमेड प्रॅक्टिकल तीन ते चार हजार रुपयांमध्ये तयार करून मिळते. एका महाविद्यालयातील प्रत्येक सत्रातील किमान १०० पेक्षा अधिक विद्यार्थी रेडिमेड प्रॅक्टिकलच दाखल करतात, अशी माहिती एका विद्यार्थ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. विविध महाविद्यालयांतील हा आकडा काही हजारांमध्ये आहे.
अपडेट माहितीचा खजिना
तयार प्रॅक्टिल देणा-या दुकानदार, झेरॉक्सवाल्यांकडे सर्व अभ्यासक्रमांची अपडेट माहिती आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना साहित्य मागण्यापूर्वीच ते सल्ला देतात. त्यात बदल कसा करायचा हेसुद्धा सांगतात, अशी माहिती समोर आली आहे.