कर्ज चुकविण्यासाठी शक्कल; स्पेअर पार्ट, चेसीस क्रमांक बदलून कार ठेवल्या विक्रीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 07:11 PM2021-06-29T19:11:00+5:302021-06-29T19:12:22+5:30
crime in aurangabad : कारवर कर्जाची मोठी रक्कम शिल्लक असताना आरोपींनी कर्ज चुकविण्यासाठी नव्या कारचे स्पेअर पार्ट काढून मुंबई येथून विकत आणलेल्या जुन्या कारला बसविले.
औरंगाबाद : फायनान्स कंपनीचे कर्ज असलेल्या नवीन कारचे स्पेअरपार्ट काढून जुन्या कारला आणि जुन्या कारचे स्पेअर पार्ट नवीन कारला बसवत कारची विक्री करणाऱ्या दोन वाहनचालकांना गुन्हे शाखेने सोमवारी पकडले. आरोपींकडून १८ लाख ५० हजार ५०० रुपये किमतीच्या चार कार जप्त केल्या. शेख सद्दाम शेख जहीर (२८, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) आणि शेख शोएब शेख जुबेर (३१, रा. प्रिया कॉलनी, पडेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ( Four cars with color and chassis number changed seized, two arrested)
प्राप्त माहितीनुसार आरोपी हे गेल्या काही दिवसांपासून जुन्या कार खरेदी- विक्रीचा व्यवसाय करीत होते. आरोपींनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन दोन कार खरेदी केल्या होत्या. या कारवर कर्जाची मोठी रक्कम शिल्लक असताना आरोपींनी कर्ज चुकविण्यासाठी नव्या कारचे स्पेअर पार्ट काढून मुंबई येथून विकत आणलेल्या जुन्या कारला बसविले. जुन्या कारचे स्पेअर पार्ट त्या नवीन कारला बसविले. शिवाय ,जुन्या कारचे चेसिस क्रमांक आणि रंगात त्यांनी फेरबदल करून कार विक्रीसाठी उपलब्ध केल्या. ही बाब गुन्हे शाखेला मिळताच सहायक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर. एम. जोंधळे, सहायक फौजदार नजीर पठाण, शेख नजीर, हवालदार सुधाकर मिसाळ, सतीश जाधव, अश्वलिंग होनराव, रवींद्र खरात, सुनील बेलकर आणि पंढरीनाथ जायभाये यांनी पडेगावतील अन्सार कॉलनीतील एका गॅरेजवर छापा मारून संशयित दोन आरोपींना पकडले आणि त्यांच्या ताब्यातून चार कार जप्त केल्या.