नवा मुहूर्त, फ्लायबिग एअरलाईन्सचे १ जूनपासून औरंगाबादहून ‘टेकऑफ’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 03:29 PM2022-05-23T15:29:09+5:302022-05-23T15:29:27+5:30
हैदराबाद - औरंगाबाद - हैदराबाद ही विमानसेवा सकाळच्या वेळेत राहणार
औरंगाबाद : फ्लायबिग एअरलाईन्सकडून १५ मे पासून हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु हा मुहूर्त हुकला. मात्र, आता १ जूनपासून सकाळच्या वेळेत ही विमानसेवा सुरु होणार आहे.
मुंबईत २६ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत फ्लायबिग आणि आकासा एअरलाइन्सच्या प्रमुखांनी औरंगाबादहून विमानसेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच औरंगाबादहून फ्लायबिग एअरलाइन्सची विमानसेवा १५ मे पासून सुरू होण्यावर शिक्कामाेर्तब झाले होते. हैदराबाद - औरंगाबाद - हैदराबाद ही विमानसेवा सकाळच्या वेळेत राहणार असल्याने हैदराबाद, तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे. १ जूनपासून ही विमानसेवा सुरु होणार असल्याचे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष व उद्योजक सुनीत कोठारी यांनी सांगितले.
इंदूर, गोंदिया कनेक्टिव्हिटी
फ्लायबिगने हैदराबाद - औरंगाबाद, औरंगाबाद- हैदराबादसोबतच हैदराबादमार्गे औरंगाबाद - गोंदिया आणि औरंगाबाद - इंदूर (मार्गे हैद्राबाद, गोंदिया) तिकीट विक्री सुरू केली आहे, अशी माहिती औरंगाबाद एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुपचे सदस्य अक्षय चाबुकस्वार यांनी दिली.