राजकारणाची नवी दिशा; मराठवाड्यात भाजपचे नेतृत्व भागवत कराडांकडे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 04:52 PM2020-06-23T16:52:16+5:302020-06-23T16:55:13+5:30
या नव्या बदलामुळे भाजपांतर्गत मराठवाड्यातील नेतृत्वबदलाची चर्चा जोरदारपणे सुरू झाली आहे.
औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात दुसऱ्यांदा स्थापन झालेल्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपतर्फे आभासी (व्हर्च्युअल) सभांचे आयोजन केले जात आहे. मराठवाड्यात मंगळवारी (दि.२३) सायंकाळी होणाऱ्या सभेच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ. भागवत कराड यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या नव्या बदलामुळे भाजपांतर्गत मराठवाड्यातील नेतृत्वबदलाची चर्चा जोरदारपणे सुरू झाली आहे.
केंद्र सरकारने वर्षभरात घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यासाठी मंगळवारी व्हर्च्युअल सभेचे आयोजन केले आहे. यात दिल्लीहून कृषी व ग्रामविकासमंत्री नरेंद्रसिंह तोमर, नागपूरहून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी असणार आहेत. यासाठी मराठवाड्यात सभेचे प्रक्षेपण करणे, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जास्तीत जास्त लोक सभेत सहभागी होतील, याचे नियोजन करण्याची जबाबदारी खा. कराड यांच्यावर सोपविली आहे.
याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कराड म्हणाले, पक्षाने मराठवाड्यातील २० लाख लोकांपर्यंत सभेचे प्रक्षेपण गेले पाहिजे असे आदेश दिले आहेत. त्यासाठी मराठवाड्याचा प्रमुख म्हणून निर्धारित केलेले लक्ष्य गाठणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. हरिभाऊ बागडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, आ. संभाजी पाटील निलंगेकर आदींची नावे चर्चेत होती. मात्र, पहिल्यांदाच राज्यसभेवर खासदार झालेले डॉ. कराड यांच्याकडे सभेची जबाबदारी आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नाराजीनाट्यानंतर डॉ. भागवत कराड यांना खासदारकी, पंकजा मुंडे यांना डावलत लातूरचे रमेश कराड यांना विधान परिषदेची आमदारकी पक्षाने दिली आहे.
भाजपची व्होट बँक असलेला ओबीसी समाज दुरावू नये, यासाठी भाजपने ही पावले उचलली असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता मराठवाड्यात खा. कराड यांना पुढे करण्यात येत असल्याने आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट होत आहे. डॉ. कराड हे भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे आणि नंतर पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणूृन मानले गेले आहेत. सद्य:स्थितीत ते माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे समर्थक मानले जाऊ लागले आहेत. पत्रकार परिषदेला आ. अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष संजय केणेकर आदी उपस्थित होते
केंद्रीय राज्यमंत्री दानवे उपस्थित राहणार
मराठवाड्यातील एकमेव केंद्रीय राज्यमंत्री असलेले रावसाहेब पा. दानवे हे मराठवाड्यासाठी होणाऱ्या व्हर्च्युअल सभेच्या औरंगाबादेतील व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्यांच्याकडे मराठवाड्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली नाही. दानवे यांच्या जावयाने मागील काही दिवसांपासून केलेल्या विविध आरोपांचाही फटका त्यांना बसत असल्याची माहिती भाजपच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.