जिल्हा परिषदेसाठी नवे चेहरे
By Admin | Published: February 5, 2017 11:15 PM2017-02-05T23:15:36+5:302017-02-05T23:18:37+5:30
लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विद्यमान सदस्यांना सर्वच पक्षांनी डावलले असून, सत्ताधारी काँग्रेससह अन्य पक्षांत केवळ १० जणांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.
आशपाक पठाण लातूर
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विद्यमान सदस्यांना सर्वच पक्षांनी डावलले असून, सत्ताधारी काँग्रेससह अन्य पक्षांत केवळ १० जणांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. ५८ सदस्य संख्या असलेल्या लातूर जिल्हा परिषदेत अनेक दिग्गजांचे तिकीट कापले गेल्याने त्यांना घरी बसावे लागले आहे. काहींनी पक्षांतर केले, तर काहींनी पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून गप्प बसणेच पसंत केले आहे. विद्यमान अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांना आरक्षणामुळे गट बदलावा लागला आहे. तर भाजप, शिवसेना व काँग्रेसच्या गटनेत्यांना पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे.
लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. ५८ सदस्यांपैकी काँग्रेस ३५, राष्ट्रवादी ९, शिवसेना ५, भाजप ८ व अपक्ष (मनसे) १ अशी सदस्य संख्या आहे. काँग्रेस पक्षाने विद्यमान सदस्यांपैकी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, गटनेते काँग्रेसचे गटनेते दिलीप पाटील नागराळकर, ज्योती पवार या तिघांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विद्यमान सदस्य चंदन पाटील यांनी मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर भाजपात प्रवेश करून त्यांच्या दुसऱ्या गटातून उमेदवारी मिळविली आहे. किल्लारी गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान सदस्य ज्योती पाटील यांचाही मतदारसंघ सर्वसाधारण झाल्याने या गटातून त्यांना दुसऱ्यांदा तिकीट मिळणे अवघड झाल्याचे लक्षात येताच त्यांचे पती बंकट पाटील यांनी भाजपात प्रवेश करून किल्लारी गटातून उमेदवारी दाखल केली आहे. मुरुड गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान सदस्या जयश्री तवले यांचा गट सर्वसाधारण झाल्याने या गटातून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. मात्र पंचायत समितीच्या महिला आरक्षित गणातून त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसचे विद्यमान सदस्य चंद्रकांत मद्दे यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. याशिवाय, सरवडी जिल्हा परिषद गटातील भाजपचे विद्यमान सदस्य भीमराव गायकवाड, अंबुलगा गटातील सदस्य डॉ. संजीव बिराजदार यांनी पक्षाकडून तिकीट मिळण्याची शक्यता धुसर झाल्याचे लक्षात घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. सध्या दोघेही शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. डॉ. संजीव बिराजदार यांना देवणी तालुक्यातील वलांडी गटातून तर भीमराव गायकवाड यांनी मदनसुरी गटातून उमेदवारी दाखल केली आहे.
औसा तालुक्यातील भादा गटातील शिवसेनेच्या विद्यमान सदस्या सविता शिंदे यांचा मतदारसंघ सर्वसाधारण झाल्याने त्यांचे पती सतीश शिंदे शिवसेनेचे उमेदवार आहेत. जिल्हा परिषदेच्या ५८ सदस्यांपैकी केवळ १० जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.