फसवणुकीचा नवा फंडा ! विम्याचे चार लाख मिळतील, फक्त साडेसात हजार पाठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 05:27 PM2021-11-12T17:27:43+5:302021-11-12T17:28:58+5:30
Cyber Crime: या ऑफर फसवणूक करण्यासाठीच असल्याची माहिती सायबर पोलिसांच्या तपासणीत समोर आले.
औरंगाबाद : विमा योजनेतील चार लाख ३० हजार ७५० रुपये मिळविण्यासाठी गुगल पेद्वारे सात हजार रुपये पाठविण्याची मागणी करणारा कॉल एका मोबाइल नंबरवरून नागरिकांना येत आहे. या अमिषाला बळी पडून पैसे पाठवू नका, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेचे निरीक्षक गौतम पातारे यांनी केले आहे.
दिवाळीच्या काळात विविध ऑफर येत आहेत. या ऑफर फसवणूक करण्यासाठीच असल्याची माहिती सायबर पोलिसांच्या तपासणीत समोर आले. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मोबाइलवर येणाऱ्या प्रत्येक ऑफरच्या मेसेजची खात्री केली पाहिजे. त्याशिवाय कोणताही व्यवहार करू नका. पैशाचे आमिष दाखविणाऱ्या कोणत्याही संदेशांवर विश्वास ठेवू नका, आपली वैयक्तिक माहिती, पासवर्ड व बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहनही निरीक्षक पातारे यांनी केले आहे. मागील काही दिवसांपासून मोबाइलवर फेक मेसेज येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन मेसेजला प्रतिसाद दिला पाहिजे. चुकीचा मेसेज वाटल्यास तो तात्काळ डिलीट करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. मागील काही दिवसांपासून एका मोबाइल नंबरवरून शहरातील नागरिकांच्या मोबाइलवर विमा योजनेतील चार लाख ३० हजार ७५० रुपये मिळण्यासाठी गुगल पेच्या माध्यमातून सात हजार रुपये पाठविण्याची मागणी करण्यात येत आहे. विमा योजनेतील एवढी मोठी रक्कम मिळणार असल्यामुळे नागरिकही या भूलथापांना बळी पडून सायबर गुन्हेगारांना पैसे पाठवित असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे अशा कोणत्याही फोनवरील माहितीच्या आधारे पैसे पाठवू नये, असे आवाहनही निरीक्षक गौतम पातारे यांनी केले.
भूलथापांना बळी पडू नये
नागरिकांना कोणताही विमा मिळविण्यासाठी गुगल पेवर कोणालाही पैसे द्यावे लागत नाहीत. असे व्यवहार होत नसतात. त्यामुळे नागरिकांना सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडून आपले पैसे पाठवू नयेत. जर कोणी असे पैसे पाठविले असतील तर सायबर शाखेशी तात्काळ संपर्क साधावा.
- गौतम पातारे, निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा