उतरला धरेवरी स्वर्ग हा नवा नवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 12:08 AM2018-07-08T00:08:00+5:302018-07-08T00:08:34+5:30

पर्यटकांना भुरळ : गौताळा अभयारण्यात घडतेय निसर्गसौंदर्याचे दर्शन

 The new heaven is new! | उतरला धरेवरी स्वर्ग हा नवा नवा!

उतरला धरेवरी स्वर्ग हा नवा नवा!

googlenewsNext

सुरेश चव्हाण
कन्नड : धुंद धुंद ही हवा, मंद मंद गारवा
उतरला धरेवरी स्वर्ग हा नवा नवा!!
या गीतातील अपेक्षित निसर्गसौंदर्य गौताळा अभयारण्यात फुलू लागल्याने हे सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांची पावले आता अभयारण्याकडे वळू लागली आहेत. सध्याच्या वातावरणात अभयारण्यात अधूनमधून पडणारा पाऊस, थंडगार हवा, पक्षांची किलबिल आणि सर्वत्र पसरलेली हिरवीगार चादर असे मनमोहक सौंदर्य काल्पनिक स्वर्गापेक्षा नक्कीच कमी नाही, असे उद्गार सहजच पर्यटकांच्या मुखातून बाहेर पडत आहेत.
कन्नडपासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावर नागद रस्त्यावर गौताळा अभयारण्य असून प्रवेशद्वारावर तपासणी नाका आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अभयारण्यास बाधा पोहोचेल अशा वस्तू अथवा प्रतिबंधात्मक वस्तू नेण्यास प्रतिबंध करण्यास मदत होते. तपासणी नाक्यावर नोंद करून नियमाप्रमाणे शुल्क भरुन अभयारण्यात प्रवेश घेता येतो. अभयारण्य औरंगाबाद व जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर २६० चौ.कि.मी.क्षेत्रावर नैसर्गिक वनराईने व्यापलेले आहे. पानगळीचे जंगल असल्याने उन्हाळ्यात पानगळ होत असल्याने डोंगर उघडे, बोडखे दिसू लागतात. त्यामुळे उन्हाळ्यात अभयारण्यातील निसर्गसौंदर्य लोप पावते. मात्र पावसाळा सुरु झाला की डोंगरावर हिरव्यागार गवताची चादर पसरते तर वृक्षही हिरवा शालू पांघरतात. उन्हाळयात मुके झालेले झरे बोलू लागतात आणि हे सगळे सौंदर्य पाहून पक्षांचाही किलबिलाट वाढतो. मधूनच मोरांचा कर्णमधूर आवाज ऐकू येतो. अशा या सौंदर्यांची अनुभुती पर्यटकांना खुणावल्याशिवाय राहत नाही.
बांधातील पाण्याने मिटली तहान
अभयारण्यात ठिकठिकाणी बांधण्यात आलेले सिमेंट, मातीनाला बांधामध्ये पाणीसाठा होत आहे. त्यामुळे प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्यातरी मिटला आहे.
ठिकठिकाणी व्ह्यू पॉइंट, धबधबे
अभयारण्यात ठिकठिकाणी व्ह्यू पॉइंट, धबधबे, निरीक्षण टॉवर, पॅगोडा आहेत. अभयारण्यातील निसर्गाच्या मुक्त सौंदर्याची उधळण नजरेत साठविण्यासाठी परदेशी पर्यटकही अभयारण्याकडे वळू लागले आहेत. शुक्रवारी (६ जुलै) जपानच्या कॅटसुकी ओटा आणि हिरोशी अ‍ॅसेनो यांनी भेट देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला. दरम्यान, पर्यटकांनी आनंद लुटताना, सेल्फी घेताना काळजी घ्यावी, असे आवाहन अभयारण्य सूत्रांनी केले आहे.

Web Title:  The new heaven is new!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.