नव्याच खुलताबाद - फुलंब्री महामार्गाला पडले तडे, अपघाताचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 07:03 PM2021-05-07T19:03:33+5:302021-05-07T19:05:26+5:30
खुलताबाद - फुलंब्री या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू असून या कामाबाबत अनेक तक्रारी असूनही राष्ट्रीय महामार्ग विभाग दखल घेत नाही.
- सुनील घोडके
खुलताबाद : खुलताबाद - ते फुलंब्री या महामार्गाच्या नवीन रस्त्याच्या कामाला तडे पडत असल्याने रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण झाले नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आ. प्रशांत बंब यांनी मतदारसंघातील कामात लक्ष घालून सुधारणा करण्याची सूचना राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्याला दोन महिन्यापुर्वीच दिल्या होत्या. परंतु, सुधारणा होण्याऐवजी रस्त्याला तडे पडू लागले आहेत.
खुलताबाद - फुलंब्री या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू असून या कामाबाबत अनेक तक्रारी असूनही राष्ट्रीय महामार्ग विभाग दखल घेत नाही. खुलताबाद तालुक्यात अंत्यत दर्जाहिन काम झाले असून रस्त्याला सराई, ममनापूर, काटशिवरीफाटा, गदाना येथे ठिकठिकाणी तडे गेले आहेत. खुलताबाद तालुक्यातील रस्त्याच्या कामाची वरिष्ठ अधिका-यांनी पाहणी करून काम चांगले करून देण्याची मागणी होत आहे. दैनिक लोकमतने २ फेब्रुवारी रोजीच्या अंकात रस्त्याच्या कामात दुजाभाव या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल आ. प्रशांत बंब व राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता यांनी जवळपास सहा तास कामाची पाहणी करून चर्चा केली होती. पंरतु, कामात कुठलीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे आ. प्रशांत बंब यांनी खुलताबाद फुलंब्री या महामार्गाचे काम चांगल्या दर्जाचे करून घ्यावे अशीच काही अपेक्षा खुलताबादकरांनी केली होती. पंरतु, ही आशा आता फोल ठरत आहे.
फुलंब्री मार्गावर अपघात वाढले
खुलताबाद ते फुलंब्री या महामार्गाचे काम जवळपास आटोपले आहेत. हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. यावरून एक सारखे वाहन चालत नाही. यामुळे अपघात वाढले आहेत.