छत्रपती संभाजीनगरात ऑफिसचे नवे मॉडेल; लोखंडी कंटेनरमध्येच सुरु होणार तलाठी कार्यालय
By विकास राऊत | Published: May 11, 2023 07:45 PM2023-05-11T19:45:45+5:302023-05-11T19:46:15+5:30
ऑफिसच्या या नव्या मॉडेलने वेळ, पैस्यांची बचत
छत्रपती संभाजीनगर : तलाठी कार्यालय बांधण्यासाठी लागणारा मोठा निधी, बांधकामासाठी लागणारा वेळ आणि बांधकामाच्या दर्जाची डोकेदुखी या सर्वांवर जिल्हा प्रशासनाने उपाय शोधला आहे. लोखंडी कंटेनरमध्येच 'रेडीमेड' तलाठी आणि कृषी सहायक कार्यालय तसेच ई-लायब्ररीचा प्रस्ताव प्रशासनाने पालकमंत्र्यांसमोर ठेवला आहे.
पालकमंत्र्यांकडून होकार मिळताच या नावीन्यपूर्ण योजनेतून ३० कोटींची तरतूद केली जाईल. जिल्ह्यात रेडिमेड ३०० तलाठी व कृषी सहायक कार्यालये उभारण्यात येतील. पालकमंत्री संदीपान भुमरे गुरुवारी (दि.११) या 'मॉडेल' ची पाहणी करतील.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रशासनाने हे लोखंडी कंटेनरमध्ये स्थापन केलेल्या कार्यालयाचे मॉडेल ठेवले आहे. बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी भरत वायाळ यांनी या मॉडेलची पाहणी केली.
जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी सांगितले, नवीन तलाठी कार्यालयासाठी मोठी प्रक्रिया आहे. निधी मागणी, निधी मंजुरी, टेंडर आणि त्यानंतर बांधकाम यासाठी मोठा कालावधी जातो. त्यानंतरही बांधकामाचा दर्जा चांगला राहीलच, याची शाश्वती नाही. बऱ्याच ठिकाणी बांधकामाचा दर्जा घसरत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच कमी कालावधीत तयार होणारे अशा प्रकारचे रेडीमेड कार्यालय थाटण्याचा विचार आहे.