वाळूज उद्योनगरीत उभारणार नवीन वाहनतळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 06:28 PM2018-12-07T18:28:15+5:302018-12-07T18:29:14+5:30
बीओटी तत्वावर नवीन वाहनतळ उभारणीचा प्रयत्न फसल्याने एमआयडीसी प्रशासनाने हा भुखंड परत घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील फोस्टर कंपनीजवळ बीओटी तत्वावर नवीन वाहनतळ उभारणीचा प्रयत्न फसल्याने एमआयडीसी प्रशासनाने हा भुखंड परत घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या ठिकाणी नवीन वाहनतळ उभारुन कामगार चौकातील वाहनतळाचा कायपालट करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने मुंबई कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे उद्योगनगरीतील वाहतुकीला शिस्त लागणार असून,वाहने व मालाची सुरक्षा होण्यास मदत मिळणार आहे.
आशिया खंडात वेगाने विकसित होणाऱ्या वाळूज औद्योगिकनगरीत जवळपास तीन हजार लहान-मोठ्या कंपन्या आहेत. यात अनेक बहुराष्टÑीय कंपन्यांचाही समावेश आहेत. औद्योगिकनगरीतील या कंपन्यात तयार होणारे उत्पादन तसेच मटेरियल वाहनाद्वारे देशाच्या विविध भागात पोहचविले जाते. या शिवाय उद्योगनगरीत सुरु असलेल्या कंपन्यात कच्चा माल घेऊन येणाºया वाहनांचीही वर्दळ असते.
उद्योगनगरीत कामगार चौकात एकमेव वाहनतळ असून, येथे मोठ्या प्रमाणात वाहने थांबतात. मात्र या वाहनतळात अपुरी जागा असल्याने तसेच सुविधांचा अभाव असल्यामुळे बहुतांश वाहनधारक औद्योगिक परिसरात तसेच मुख्य रस्त्यावर वाहने उभी करतात. यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या या वाहनातून माल चोरी होण्याचे प्रकार नेहमीच घडतात. उद्योनगरीत नवीन वाहनतळ उभारण्यात यावे, यासाठी उद्योजक संघटनांच्यावतीने एमआयडीसी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. आजघडीला कामगार चौकात एमआयडीसीचे एक वाहनतळ असून, बजाज आॅटो कंपनीचे स्वत:चे वाहनतळ आहे. बजाज कंपनीच्या वाहनतळात इतर वाहनांना थांबण्यास परवानगी नसल्याने इतर वाहनधारकांना औद्योगिकनगरीत मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करावी लागतात.
कामगार चौकातील वाहनतळात जागा अपुरी पडत असल्याने एमआयडीसी प्रशासनाने एम सेक्टरमध्ये बीओटी तत्वार सर्व सुविधायुक्त वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला होता. याचा ठेका मुंबईच्या मे.भारत उद्योग कंपनीने घेतला होता. यासाठी एमआयडीसीने दहा एकर जागाही दिली आहे. मात्र, संबधित ठेकेदाराने या वाहनतळाचे कामच सुरु केले नाही. हा प्रयोग फसल्याने आता एमआयडीसी प्रशासनाने भारत उद्योग कंपनीला वाहनतळ उभारणीसाठी दिलेली जागा परत घेण्याची कारवाई सुरु केली आहे.
या ठिकाणी एमआयडीसीकडून वाहनतळ उभारण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या विषयी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा देत नवीन वाहनतळ उभारणीसाठी मुंबई कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
कामगार चौकातील वाहनतळाचा होणार कायापालट
एमआयडीसीकडून कामगार चौकात दोन दशकांपूर्वी उभारलेल्या वाहनतळाची आजघडीला दयनीय अवस्था झाली आहे. परिसरात खड्डेच-खड्डे पडले असून, वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रसाधनगृहाची दुरवस्था झाली असून, वाहनचालक-क्लिनर यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाकडून कामगार चौकातील वाहनतळात अत्यावश्यक सुविधा पुरविण्यासाठी पावले उचलण्यात आले आहे. या वाहनतळातील रस्त्याचे काँक्रिटीकरण व स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीची कामे सुरु करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती उपअभियंता सुधीर सुत्रावे यांनी दिली.