सेवानिवृत्तांची चांदी; नवीन लोकांना संधीच मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 01:26 AM2017-11-05T01:26:30+5:302017-11-05T01:26:33+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सेवानिवृत्त झालेले बहुतांश प्राध्यापक विविध पदांवर कार्यरत आहेत. युवा प्राध्यापकांना संधी देण्यात येत नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सेवानिवृत्त झालेले बहुतांश प्राध्यापक विविध पदांवर कार्यरत आहेत. युवा प्राध्यापकांना संधी देण्यात येत नाही. प्राध्यापकांच्या रिक्त जागांनी शंभरी ओलांडली. शिक्षकेतर कर्मचा-यांमध्येही २५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचा-यांची पदे रिक्त आहेत. याच वेळी विद्यापीठात कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांचा आकडा ६४५ पेक्षा अधिक झाला आहे. नियोजनाच्या अभावामुळे मागील साडेतीन वर्षांत एकही जागा भरलेली नाही, हे विशेष.
विद्यापीठात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात अनेक वेळा कुलसचिव, परीक्षा संचालक, वित्त व लेखाधिका-यांसह प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली. मात्र या जागा काही भरण्यात आलेल्याच नाहीत. विद्यापीठात सद्य:स्थितीला प्राध्यापकांची २८९ पदे मंजूर आहेत. यात ३० पदे विद्यापीठ फंडातून भरण्यात आलेली आहेत. त्या पदांचेही राज्य सरकारने दायित्व स्वीकारले असून, विद्यापीठ प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे त्या पदांचा निधी मिळालेला नाही. यातच प्राध्यापकांच्या रिक्त पदांचा आकडा १०५ पेक्षा अधिक झाला आहे. राज्य सरकारने नोकरभरतीवर बंदी घातल्यामुळे ही पदे भरता येणार नाहीत. नोकरभरतीवरील बंदी उठण्याची शक्यता सद्य:स्थितीत नसल्यामुळे हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याच वेळी विद्यापीठात सप्टेंबर २००९ च्या आकृतिबंधानुसार शिक्षकेतर कर्मचा-यांची ७७७ पदे मंजूर आहेत. यातील केवळ ५१० कर्मचारी सध्या कार्यरत असून, उर्वरित पदे रिक्त आहेत. या पदात वर्ग-१ ची ५४ पदे मंजूर आहेत. यात केवळ २६ पदे भरलेली आहेत. यापैकी दोन जण लीनवर गेलेले आहेत. तर विद्यापीठात ४६५ कंत्राटी कर्मचारी, १२० सुरक्षारक्षक आणि ६० स्वच्छता कर्मचारी कंत्राटी पद्धतीवरच कार्यरत आहेत. हा एकूण आकडा ६४५ पेक्षा अधिक आहे. या सर्व कंत्राटी कर्मचाºयांना विद्यापीठ फंडातून वेतन देण्यात येते. मागील साडेतीन वर्षांत शिक्षकेतर कर्मचारी भरती करण्यात आली असती, तर विद्यापीठ फंडाचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी झाला असता हे नक्की. यातच राज्य सरकारने नोकरभरतीवर बंदी घालताना सुधारित आकृतिबंध सादर करण्याचे आदेश दिले होते.
विद्यापीठ प्रशासनाने हा आकृतिबंध सादर करण्यासही विलंब केला होता. प्रशासनाची दयनीय अवस्था असताना कुलगुरूंना याकडे लक्ष देण्यासही वेळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनेक विभाग प्राध्यापकांविना
विद्यापीठातील अनेक विभागांत एकही प्राध्यापक कार्यरत नसल्याचे दिसून आले.
या एकही प्राध्यापक नसलेल्या विभागांमध्ये उदार कला, नॅनो टेक् नॉलॉजी, म्युझिक, योगा, नृत्यशास्त्र, पाली अॅण्ड बुद्धिझम अशा अनेक विभागांचा समावेश आहे. तर केवळ एकच प्राध्यापक असणाºया विभागांमध्ये भूगोल, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, परकीय भाषा अशा विभागांचा समावेश आहे. या सर्व अभूतपूर्व शिक्षक टंचाईवर तोडगा काढण्यासाठी विद्यापीठाने १६ प्राध्यापकांची २४ हजार रुपये मानधनावर ११ महिन्यांसाठी नेमणूक करण्यासाठी शुक्रवारी जाहिरात काढली आहे. हा प्रकार म्हणजे दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखाच आहे.