नव्या संशोधनाने कॉर्निया प्रत्यारोपणातील अपयश टाळणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 07:27 PM2018-10-31T19:27:20+5:302018-10-31T19:27:56+5:30
या नव्या संशोधनाने कॉर्निया प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील यशाची टक्केवारी वाढण्यास मदत होत आहे, असे ब्रिटनमधील नॉटिंगहॅम नेत्र विभागाचे प्रमुख आणि दुआ लेअरचे जनक डॉ. हरमिंदरसिंग दुआ म्हणाले.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : पाच वर्षांपूर्वी डोळ्यातील सहाव्या पापुद्र्याचा शोध लावला. यापुढे जाऊन आता तीन आठवड्यांपूर्वीच कॉर्निया प्रत्यारोपणातील अडचणींवर नवीन संशोधन केले. डोळ्याचा बाहेरून दिसणारा स्वच्छ काचेसारखा पारदर्शक बाह्यपटलाचा भाग म्हणजे कॉर्निया. या नव्या संशोधनाने कॉर्निया प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील यशाची टक्केवारी वाढण्यास मदत होत आहे, असे ब्रिटनमधील नॉटिंगहॅम नेत्र विभागाचे प्रमुख आणि दुआ लेअरचे जनक डॉ. हरमिंदरसिंग दुआ म्हणाले.
नेत्ररोगतज्ज्ञांच्या तीनदिवसीय राज्यस्तरीय परिषदेनिमित्त डॉ. हरमिंदरसिंग दुआ हे शहरात आले होते. यावेळी ‘लोकमत’शी संवाद साधताना डोळ्यांचे आजार आणि केलेल्या संशोधनावर त्यांनी प्रकाश टाकला. डॉ. हरमिंदरसिंग दुआ म्हणाले की, २०१३ मध्ये संशोधन केले आणि मनुष्याच्या डोळ्यातील सहाव्या प्रापुद्र्याचा शोध लावला. गेली अनेक वर्षे जगाला फक्त पाच पापुद्रे माहीत होते. सहाव्या पापुद्र्याला दुआ लेअर म्हणून ओळख मिळाली. या नव्या पापुद्र्याच्या शोधाने तीन नवीन शस्त्रक्रियाही तयार झाल्या. फ्रान्स, इजिप्त आणि आपल्याकडे या नव्या शस्त्रक्रिया तयार झाल्या. या दुआ लेअरच्या संशोधनाची तब्बल २ हजार ८० वैज्ञानिक संशोधन पेपरमध्ये नोंद झाल्याचे ते म्हणाले.
तीन आठवड्यांपूर्वी आणखी एक नवीन संशोधन के ले. कॉर्निया प्रत्यारोपण करताना एक पापुद्रा (लेअर) टाकला जातो. हा पापुद्रा एकाच पद्धतीने उघडावा लागतो. त्यासाठी येणाऱ्या अडचणीने कधी-कधी शस्त्रक्रिया अपयशी होते. हे का होते, हे संशोधनातून शोधून काढले. रसायनाच्या मदतीने पापुद्रा सहज उघडला जाईल, हे समोर आणले. हे संशोधन अमेरिकेतील जर्नल्समध्ये प्रकाशित झाल्याचेही डॉ. दुआ यांनी सांगितले. नवीन डॉक्टरांकडून होणाऱ्या संशोधनाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी परिषदेत आयोजन समितीच्या प्रमुख डॉ. सुनयना मलिक, सचिव डॉ. राजीव मुंदडा यांची उपस्थिती होती.
मोतीबिंदूचे वय घटले
जगाच्या तुलनेत २५ टक्के अंध भारतात आहेत. यामध्येही ७० टक्के अंधत्व हे केवळ मोतीबिंदूमुळे आलेले आहे. सरकारकडून प्रयत्न होत आहेत; परंतु त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर, रुग्णालय अपुरे पडत आहेत. पूर्वी वयाच्या ६० वर्षांनंतर मोतीबिंदू आढळत असे. आता हे वय कमी होऊन ४० ते ५० वर्षांपर्यंत आले आहे. ज्येष्ठांच्या मोतीबिंदूकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मोतीबिंदूबरोबरच ज्येष्ठाचा मृत्यू होत असल्याची चिंताही डॉ. दुआ यांनी व्यक्त केली.
डोळे कोरडे होण्याचे प्रमाण वाढले
डॉ. हरमिंदरसिंग दुआ म्हणाले की, डोळे कोरडे होणे हे केवळ पूर्वी ज्येष्ठांतच दिसत असे; परंतु प्रदूषण, संगणक, मोबाईलचा अतिवापर, झोपेचे प्रमाण कमी होणे यासारख्या कारणांनी डोळे कोरडे होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. त्यातही युवकांमध्ये ही बाब अधिक दिसते. त्यातून डोळ्याची नजर कमी होणे, डोळ्यात वाळू, मिर्ची पडल्यासारखे वाटणे, असा त्रास होतो.