औरंगाबाद जिल्ह्यात नवे निर्बंध; अधिकाऱ्यांच्या रजा रद्द, हुरडा पार्ट्या, रिसॉर्ट, फार्महाऊसवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 11:47 AM2022-01-06T11:47:10+5:302022-01-06T11:49:44+5:30
सभा, कार्यक्रम, हॉटेल, रिसॉर्टमधील गर्दीचे चित्रीकरण करण्यासाठी पथक गठित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
औरंगाबाद : विभागात सर्वाधिक रुग्ण औरंगाबादमध्ये आढळल्यामुळे जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्री उशिरापर्यंत टास्क फोर्सची बैठक घेत कडक निर्बंध लागू केले आहेत. यात हुरडा पार्ट्या, फार्महाऊसवर बंदी आणल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
दौलताबाद, अब्दीमंडी भागात नाईटपार्ट्या सुरू असतात. फार्महाऊस सुरू असल्याचे आढळले तर सील करून गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याबाबत सोमवारी निर्णय घेण्यात येणार आहे.
हॉटेलमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी मालकांनी घ्यावी, गर्दीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास हॉटेल सील करण्यात येईल. सभा, कार्यक्रम, हॉटेल, रिसॉर्टमधील गर्दीचे चित्रीकरण करण्यासाठी पथक गठित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हुरडा पार्टीवर पूर्णपणे निर्बंध आणले आहेत. हुरडा पार्टी सुरू असल्यास शहर व ग्रामीण पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शहराबाहेरील फार्महाऊस, रिसॉर्टवर बंदी आणली आहे. फार्महाऊस सुरू दिसल्यास पोलीस अधीक्षक कारवाई करतील. लसीकरणाविना आणि मास्कशिवाय पेट्रोलपंपांवर इंधन मिळणार नाही, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. बैठकीला पोलीस, जि.प., आरोग्य प्रशासनातील वरिष्ठांची उपस्थिती होती.
होम क्वारंटाईनसाठीचे आदेश
कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णाला गृह विलगीकरणात राहायचे असेल तर घरातील सर्व सदस्यांचे लसीकरण (दोन्ही डोस) पूर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. घरातील इतर सदस्यांनी होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक असेल. तसेच इतर सदस्यांनी बाहेर फिरू नये.
लग्नाच्या बुकिंगचे हमीपत्र द्यावे लागणार
मंगल कार्यालयाने आगामी लग्नाच्या बुकिंगची माहिती प्रशासनाला कळवावी. कळविली नाहीतर कारवाई करण्यात येईल. ५० पेक्षा जास्त गर्दी होणार नाही याचे मंगल कार्यालयांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. शहर आणि ग्रामीण भागातील लग्नांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पथक गठित करण्यात येणार आहेत. गर्दीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस कारवाई करतील.
सिल्लोड तहसीलदाराची रजा नाकारली
सिल्लोडच्या तहसीलदाराने रजेसाठी केलेला अर्ज नाकारण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या इमर्जन्सीसारखा काळ आहे, त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना रजा मिळणार नाही. त्यामुळे रजा रद्द केल्याचे सांगण्यात आले.