मराठवाड्यात १२८ कोटींतून होणार २९९ कि़मी. रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:54 AM2018-07-31T00:54:04+5:302018-07-31T00:54:27+5:30
राष्ट्रीय महामार्ग राज्य विभागाकडून मराठवाड्यात २९९ कि़मी. रस्त्यांची कामे नव्याने होणार असून, त्यासाठी १२८ कोटी रुपयांची तरतूद नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मुख्यालयाकडून करण्यात आलेली आहे.
विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राष्ट्रीय महामार्ग राज्य विभागाकडून मराठवाड्यात २९९ कि़मी. रस्त्यांची कामे नव्याने होणार असून, त्यासाठी १२८ कोटी रुपयांची तरतूद नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मुख्यालयाकडून करण्यात आलेली आहे.
विभागातील प्रत्येक जिल्ह्यात ३० ते ४० कि़ मी. दरम्यान ही कामे होणार असून, त्यासाठी १५ ते १६ कोटी रुपयांची तरतूद जिल्हानिहाय करण्यात आलेली आहे. येत्या दोन वर्षांत मराठवाड्यातील २९९ कि़मी.ची कामे काँक्रिटीकरणातून करण्याचा राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मानस आहे. भोकरदन ते हसनाबाद मार्गे जवखेडा ते राजूर मार्गे देऊळगावराजा या ६७ कि़ मी. रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. ३०४ कोटी रुपयांतून होणारे हे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा मुख्य अभियंता एल. एस. जोशी यांनी केला.
या कामांव्यतिरिक्त येवला ते शिऊर या रस्त्याचे काम १५५ कोटींतून होत आहे. २९ कि़मी.चे ते काम आहे. ए.आर.कन्स्ट्रक्शन्सकडे ते काम देण्यात आले आहे. खुलताबाद ते फुलंब्री मार्गे पाल फाटा हे काम गंगामाई कन्स्ट्रक्शन करीत असून, १५८ कोटी रुपयांच्या खर्चातून ३२ कि़मी.चा रस्ता करण्यात येणार आहे. हासनी दुधार हा २९ कि़मी. चा रस्ता १४५ कोटींतून करण्यात येत असून, गुजरातच्या सरस्वती कन्स्ट्रक्शन्सकडे ते काम देण्यात आले आहे. धाड ते भोकरदन मार्गे सिल्लोड या रस्त्यावर ३२० कोटी खर्च होत असून, ५५ कि़मी.पर्यंत रस्त्याचे काम त्यातून केले जाणार आहे. हे सगळे रस्ते द्विपदरी होणार असून १४ मीटरपर्यंत टॉपविड्थ असून सर्व रस्ते काँक्रिटीकरणातून होणार आहेत. या शिवाय वडीगोद्री ते जालना हा रस्ता २४० कोटींतून करण्यात येणार आहे. ५५ कि़मी.पर्यंत तो रस्ता असणार आहे.