‘स्वाधार’साठी यंदापासून नवा नियम; शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला, तरच मिळणार लाभ!

By विजय सरवदे | Published: August 19, 2024 03:54 PM2024-08-19T15:54:23+5:302024-08-19T15:57:14+5:30

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी यंदापासून नवा नियम

New rule for 'Swadhar' Scholarship from this year; If you apply for government hostel, you will get benefits only! | ‘स्वाधार’साठी यंदापासून नवा नियम; शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला, तरच मिळणार लाभ!

‘स्वाधार’साठी यंदापासून नवा नियम; शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला, तरच मिळणार लाभ!

छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही जर शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तरच अशा विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

या शिष्यवृत्ती योजनेसाठी ३० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे. यंदापासून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. पारंपरिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सध्यातरी जुनाच नियम लागू असल्याचे समाज कल्याण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

केवळ आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांची शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांची परवड होऊ नये, यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे.

स्वाधार शिष्यवृत्ती योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निवास भत्ता, भोजन भत्ता, निर्वाह भत्ता दिला जातो.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम ही आधार लिंक असलेल्या त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केली जाणार आहे.

जिल्ह्यात १९ वसतिगृहे
जिल्ह्यात समाज कल्याण विभागामार्फत चालविली जाणारी १९ शासकीय वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे ३५० ते ४०० जागा आहेत.

अर्ज केला, तरच मिळणार स्वाधार योजनेचा लाभ
शासकीय वसतिगृहांसाठी ऑनलाइन अर्ज केला, तरच विद्यार्थ्यांचा स्वाधार शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाणार आहे. स्वाधार शिष्यवृत्ती आणि वसतिगृह प्रवेशासाठी एकच अर्ज राहणार आहे.

व्यावसायिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ३० ऑगस्टची मुदत
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार शिष्यवृत्तीचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंतची मुदत आहे.

महाआयटी पोर्टलवर करा अर्ज
शासकीय वसतिगृह, तसेच स्वाधार शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना येत्या ३० ऑगस्टपर्यंत महाआयटी पोर्टलवर अर्ज भरावा लागणार आहे.

Web Title: New rule for 'Swadhar' Scholarship from this year; If you apply for government hostel, you will get benefits only!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.