फसवणुकीचा नवा फंडा! जुन्या एक रुपयाच्या नाण्यासाठी सात लाख रुपये देतो
By प्रशांत तेलवाडकर | Published: November 8, 2022 04:22 PM2022-11-08T16:22:27+5:302022-11-08T16:23:50+5:30
सोशल मीडियाचा गैरफायदा घेत जुन्या नाण्यांच्या खरेदीचे आमिष देऊन फसवेगिरी होत आहे
औरंगाबाद : तुमच्याकडे १९७८ सालचे १ रुपयाचे नाणे आहे का? ज्यात खाली टिंब असायला हवे, तर तुम्हाला मिळू शकते. ६ लाख ७० हजार ५२० रुपये... हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल; पण अशा प्रकारचे स्पॅम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या मोहात पडून तुम्ही आपल्याकडील नाणी कुरिअरने पाठवू नका... तुमच्याकडील जी नाणी आहेत, ती गमावून बसाल.
फसवणुकीचा नवा फंडा
काही महिन्यांपासून सोशल मीडियावर स्पॅम व्हिडिओ व्हायरल होत आहे. ‘एक रुपयाचे एक दुर्मीळ नाणे १० कोटींना विकले गेले. तुम्हीही लाखो रुपये कमवू शकता किंवा १९८८ यावर्षी चलनात आलेले व त्यावर गेंड्याचे चित्र असलेले नाणे दाखविले जाते व तुमच्याकडे असे नाणे असेल तर पाठवा, तुम्हाला १७ लाख रु. मिळतील. असे दाखविले जाते. मोबाईल नंबरही दिला जातो. अनेक लोक आपल्याकडील अशी नाणी कुरिअरने पाठवत आहेत. मात्र, काहीच उत्तर येत नाही.
दुर्मीळ नाणी शोधण्यासाठी रविवारच्या बाजारात गर्दी
१९७७-१९८४ या वर्षात चलनात आलेली व ज्यावर इंदिरा गांधी यांचा छापा असलेली नाणी असो वा १९८९ मध्ये चलनात आलेली जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी असे लिहिलेली नाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही नाणी पाठविली तर लाखो रुपये मिळतात. या मोहापायी मोंढ्यातील रविवारच्या आठवडी बाजारात अनेकजण गेले... तिथे जुनी नाणी विक्रेत्याच्या भोवती गराडा होता. ढिगातून एक-एक नाणे शोधले गेले. शहरात फाटक्या नोटा खरेदी करणे किंवा जुन्या नाण्यांचा संग्रह करणाऱ्याकडेही हे लोक जाऊन जुनी नाणी आहे का, याचा शोध घेत आहेत.
आम्ही फसलो, तुम्ही फसू नका
माझ्याकडे घोड्याचा छापा असलेला लाल रंगातील एक पैसा माझ्या पाहण्यात आला. मी सोशल मीडियावर हा संग्रहाचा फोटो टाकला. मला थोड्या वेळातच फोन आला, तुम्हाला या एक पैशाचे एक हजार रुपये मिळतील. एका जणाकडे पाच नाणी मिळाली. मी त्यास एका नाण्यासाठी ५०० रुपये दिले. अडीच हजार रुपये मोजले. दिलेल्या पत्त्यावर पाट५ नाणी पाठविली. दोन आठवडे झाले पण अजून निरोप नाही. मोबाईल नंबर बंद येत आहे. मी फसलो, तुम्ही फसू नका.
- विजय सोनवणे, फसविले गेलेले नागरिक
मी तर ५० कोटींचा मालक झालो असतो
माझ्याकडे अनेक वर्षांपासूनच्या जुनी, दुर्मीळ नाण्यांचा संग्रह आहे. असे जर हजारो, लाखो रुपये जण या नाण्यांना मिळाले असते तर मी ५० कोटींपेक्षा अधिक रकमेचा मालक झालो असतो. मी लोकांना आवाहन करतो की, दुर्मीळ नाण्यांला लाखो रुपये मिळतात, ही सर्व फसवेगिरी आहे. कोणीही फसू नका.
- सुधीर कोर्टीकर, जुन्या नाण्यांचे संग्राहक