प्रतीक्षा महासणांची, दसरा-दिवाळीसाठी बाजारपेठेत नवीन स्टॉक दाखल

By प्रशांत तेलवाडकर | Published: September 20, 2022 06:20 PM2022-09-20T18:20:14+5:302022-09-20T18:20:41+5:30

परराज्यात खरेदीला गेलेले व्यापारी परतीच्या वाटेवर

New stocks entered the market for mega festival Dussehra-Diwali | प्रतीक्षा महासणांची, दसरा-दिवाळीसाठी बाजारपेठेत नवीन स्टॉक दाखल

प्रतीक्षा महासणांची, दसरा-दिवाळीसाठी बाजारपेठेत नवीन स्टॉक दाखल

googlenewsNext

औरंगाबाद : दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दसरा-दिवाळी सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या आधीपेक्षा यंदा २५ ते ३० टक्के व्यवसाय वाढेल, अशी व्यापाऱ्यांना आशा आहे. यामुळे बाजारपेठेत मोठी लगबग सुरू आहे. विविध सामान खरेदीसाठी परराज्यात गेलेले व्यापारी आता परतीच्या मार्गावर असून, नवीन स्टॉक बाजारात दाखल होऊ लागला आहे. कोट्यवधींची उलाढाल येत्या काळात होणार असल्याने ग्राहकराजाच्या स्वागतासाठी दुकाने सजू लागली आहेत.

वर्षभरातील निम्मी उलाढाल फक्त दसरा-दिवाळी दरम्यान होत असते. यामुळे सर्व व्यावसायिक व उद्योगाच्या नजरा या दोन महासणांवर टिकून असतात. यात विशेषत: कापड बाजार, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, मोबाईल, भेटवस्तू, किराणा बाजार, मिठाई उद्योग, भांडी बाजार, वाहन बाजारात मोठी उलाढाल होते. सणासुदीत नवीन कपडे खरेदीला प्राधान्य दिले जाते. नवीन डिझाईनच्या कपडे, साडी खरेदीसाठी व्यापारी मुंबई, इंदोर, सूरत, कोलकत्ता इ. ठिकाणी गेले होते, अशी माहिती व्यापारी अजय तलरेजा यांनी दिली.

इलेक्ट्रॉनिक्स बाजारात दसरा- दिवाळी दरम्यान जिल्ह्यात १२ हजार टीव्ही विकतील, असा अंदाज संघटनेचे माजी अध्यक्ष अरुण जाधव यांनी वर्तवला. यातही ४३ इंच, ५० इंच, ५५ इंच व ६५ इंचांचे टीव्ही जास्त विकतील. फुल एचडी, फोर के व गुगल या एलईडी टीव्हीला डिमांड राहणार आहे.

याशिवाय वाहन बाजारातही नवीन दुचाकी उपलब्ध झाल्या आहेत. प्रतीक्षायादी नाही. यामुळे यंदा दसरा -दिवाळी दरम्यान ४ हजार दुचाकी विक्री होतील, अशी शक्यता वितरक हेमंत खिंवसरा यांनी व्यक्त केली. मोबाईलमध्येही नवनवीन मॉडेल लाँच होत आहेत. फाईव्ह जी मॉडेलची सध्या चलती आहे.

एक हजार कोटींची होणार उलाढाल
बाजारपेठेत दसऱ्याच्या नवीन स्टॉकची पहिली व दुसरी खेप दाखल झाली आहे. काहींनी दुकानाला नवीन फर्निचर, रंगरंगोटी केली आहे. कोणत्याही वस्तूंचा तुटवडा जाणवणार नाही. मुबलक स्टॉक आला असून बाजारपेठेत दसरा-दिवाळीदरम्यान सुमारे एक हजार कोटींची उलाढाल होईल.
- विजय जैस्वाल, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

२५ टक्के अधिक मालवाहतूक
पुणे, मुंबई, सूरत येथून मालवाहतूक होत आहे. नेहमीपेक्षा २० ते २५ टक्के मालवाहतूक वाढली आहे. काही मालवाहतूकदारांच्या गोदामात माल ठेवण्यासाठी जागा नाही, अशी परिस्थिती आहे.
- फय्याज खान, अध्यक्ष, मालवाहतूकदार संघटना

Web Title: New stocks entered the market for mega festival Dussehra-Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.