‘स्लॉट’ मिळताच औरंगाबादसाठी नव्या विमानसेवेचे ‘टेक ऑफ ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 05:17 PM2019-07-31T17:17:52+5:302019-07-31T17:20:04+5:30
मुंबई, दिल्ली विमानतळांकडून उड्डाणाची वेळ हवी
औरंगाबाद : औरंगाबादहून नव्या विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्या तयार आहेत. मात्र, दिल्ली आणि मुंबई विमानतळाकडून स्लॉट (विमान उड्डाणासाठी वेळ) मिळाल्यानंतरच विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती मंगळवारी (दि.३०) दिल्लीत टूर आॅपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांच्या विमान कंपन्यांसोबत झालेल्या बैठकीतून समोर आली. त्यामुळे स्लॉट कधी मिळतो याकडे लक्ष लागले असून, त्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
औरंगाबादमध्ये देशांतर्गत पर्यटन, उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी विमानांची संख्या वाढवून राजस्थान, दिल्ली आणि मुंबईची एअर कनेक्टिव्हिटी बळकट करण्याच्या मागणीसाठी टूर आॅपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांचे शिष्टमंडळ दिल्लीमध्ये आहे. या शिष्टमंडळात उद्योजक सुनीत कोठारी यांच्यासह कॉक्स अँड किंग कंपनीचे सरव्यवस्थापक तरुण खुल्लर, इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटरचे अध्यक्ष प्रणव सरकार, उपाध्यक्ष राजीव मेहरा आणि औरंगाबाद टुरिजम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत यांचा सहभाग होता.
या शिष्टमंडळाची एअर इंडियासह तीन विमान कंपन्यांसोबत सलग तिसरी बैठक पार पडली. याबाबत अधिक माहिती देताना शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत असलेले सुनीत कोठारी म्हणाले, औरंगाबादहून राजस्थान, दिल्ली आणि मुंबई विमान कनेक्टिव्हिटी वाढविण्यासंदर्भात मागील तीन महिन्यांपासून विमान कंपन्यांकडे पाठपुरावा करीत आहोत. याच संदर्भात दिल्लीत मंगळवारी तीन विमान कंपन्यांसोबत बैठक झाली. यादरम्यान विमानसेवा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि त्या कशाप्रकारे सोडविता येतील, यावर सखोल चर्चा झाली. औरंगाबादेतून विमानसेवा सुरू करण्यासाठी येणाऱ्या बहुतांश अडचणी आता दूर झाल्या असल्या तरीही दिल्ली आणि मुंबईच्या विमानतळ कंपन्यांकडून अद्याप स्लॉट मिळालेला नाही. त्यासाठी यापुढे प्रयत्न केले जाणार आहेत.
औरंगाबादचा समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करा
परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रवासात सूट मिळत असलेली डिस्कव्हर इंडिया फेअर ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी ही योजना नक्कीच फायद्याची ठरू शकेल. १५ ते २१ दिवसांसाठी ही योजना सुरू करण्याचा विचार केला जाईल. ही योजना पुन्हा सुरू झाल्यास आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल. औरंगाबादचा समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करण्यात यावा, अशीही मागणी शिष्टमंडळाने लावून धरली आहे.
पाठपुरावा सुरू
विमान कंपन्यांनी औरंगाबादसाठी विमान राखीव ठेवलेले आहे. हा स्लॉट मिळाल्यानंतर लगेचच विमानसेवा सुरू करता येणार आहे. त्यासाठी विमान कंपन्या, पर्यटन उद्योगातील व्यावसायिक आणि लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करीत असून, लवकरात लवकर औरंगाबाद राजस्थान, दिल्ली आणि मुंबईशी जोडले जाईल.
- सुनीत कोठारी, उद्योजक