९५ टक्के प्रवाशांचा आग्रह; ‘जनशताब्दी एक्सप्रेस’च्या आधी पहाटे मुंबईसाठी हवी नवी रेल्वेगाडी

By संतोष हिरेमठ | Published: November 5, 2023 11:07 AM2023-11-05T11:07:14+5:302023-11-05T11:10:01+5:30

प्रवाशांना मिळत नाही आरक्षण, सध्या सुरू असलेल्या रेल्वेची संख्या अपुरी

New train wanted for Mumbai early in the morning before 'Janshatabdi Express'; Insistence of 95 percent passengers of Chhatrapati Sambhajinagar | ९५ टक्के प्रवाशांचा आग्रह; ‘जनशताब्दी एक्सप्रेस’च्या आधी पहाटे मुंबईसाठी हवी नवी रेल्वेगाडी

९५ टक्के प्रवाशांचा आग्रह; ‘जनशताब्दी एक्सप्रेस’च्या आधी पहाटे मुंबईसाठी हवी नवी रेल्वेगाडी

- संतोष हिरेमठ/सुमेध उघडे
छत्रपती संभाजीनगर:
मुंबईसाठी छत्रपती संभाजीनगरहून पूर्वीप्रमाणे पहाटे ६ वाजता रेल्वे पाहिजे. जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्याच्या मागणीकडे रेल्वे प्रशासन वर्षभरापासून दुर्लक्ष करीत आहे. या रेल्वेची वेळ बदलता येत नसेल तर ‘जनशताब्दी एक्सप्रेस’आधी छत्रपती संभाजीनगरहून पहाटे मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरु केली पाहिजे, असे आग्रही मत ९५ टक्के प्रवाशांनी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात मांडले आहे.

मुंबईसाठी सध्या राज्यराणी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस धावतात. जनशताब्दी एक्स्प्रेस पूर्वी कोरोनापूर्वी पहाटे ६ वाजता छत्रपती संभाजीनगरहून सुटत असे आणि मुंबईत दुपारी एक वाजेपर्यंत पोहोचत असे. त्यामुळे मुंबईतील कामे आटोपून नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसने त्याच दिवशी परतीचा प्रवास प्रवाशांना करता येत असे; परंतु, ही रेल्वे आता छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ९.२० वाजता सुटते आणि दुपारी ४.२० वाजता मुंबईत पोहोचते. त्यातून जनशताब्दी एक्स्प्रेसने मुंबईत गेल्यानंतर मुक्काम केल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेसच्या आधी शहरातून मुंबईसाठी नवीन रेल्वेची आवश्यकता आहे का, यासंदर्भात सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रवाशांचे मत जाणून घेण्यात आले.

सर्वेक्षणात विचारलेले प्रश्न: 
छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे जाण्यासाठी सध्याच्या रेल्वे पुरेशा आहेत का?

- हाेय-० टक्के
- नाही-९५.७ टक्के
- सांगता येत नाही-४.३ टक्के

छत्रपती संभाजीनगरहून जनशताब्दी एक्स्प्रेसच्या आधी सकाळच्या वेळेत नवीन रेल्वे सुरु व्हावी का?
- हाेय-९५.७ टक्के
- नाही-० टक्के
- सांगता येत नाही-४.३ टक्के

सर्वेक्षणात कोणत्या वयोगटातील प्रवाशांचा सहभाग?
- १८ ते ३५ वर्षे- १३ टक्के
- ३६ ते ६० वर्षे - ७८.३ टक्के
- ६१ ते ७५ वर्षे- ८.७ टक्के

सर्वेक्षणात प्रवाशांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया: 
- रेल्वे तर आणखी सुरू व्हावी, पण जनरल डब्बेदेखील वाढवावेत.
- सकाळी मुंबईसाठी नवीन रेल्वे हवीच
- वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करावी.
- मुंबईसाठी सकाळी ६ वाजता नव्या रेल्वेची गरज.
- मुंबईसाठी आणखी किमान २ रेल्वे तरी पाहिजे. एक सकाळी आणि एक संध्याकाळी.
- नांदेड ते मुंबई अजून ४ रेल्वे पाहिजेत.
- दिवसातून दोन रेल्वे असाव्यात. एक सकाळी ६ वाजता आणि दुसरी दुपारी १२ वाजता छत्रपती संभाजीनगरहून निघावी. परतीची वेळ दुपारी ३ आणि रात्री ९ वाजेची असावी.
- जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदला.
- मुळात मराठवाड्यातून मुंबई किंवा नाशिकला जाण्यासाठी कमी रेल्वे आहेत. रेल्वेचे आरक्षण भेटणे अवघड झाले आहे. अगदी आरक्षण असले तरी त्या बोगीत बसायला अवघड होते इतकी गर्दी असते.

Web Title: New train wanted for Mumbai early in the morning before 'Janshatabdi Express'; Insistence of 95 percent passengers of Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.