औरंगाबाद मेट्रो मार्गाला नवीन ‘वळण’; 'शेंद्रा ते वाळूज' अखंड नसेल, नव्या २ मार्गांचे सादरीकरण
By मुजीब देवणीकर | Published: February 11, 2023 05:47 PM2023-02-11T17:47:26+5:302023-02-11T17:48:09+5:30
शहराची वाढती लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून निओमेट्रो रेल्वे सुरू व्हावी, यासाठी स्मार्ट सिटीकडून प्रयत्न केले जात आहेत.
औरंगाबाद : शेंद्रा एमआयडीसी ते थेट वाळूजपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येईल. मात्र, मेट्रोसाठी आता नवीन मार्ग निवडण्यास महापालिकेनेही अनुकूलता दाखवली. क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन असा नवीन मार्ग निवडण्यात आला आहे. शुक्रवारी महामेट्रोने प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर डीपीआरचे सादरीकरण केले. रेल्वे स्टेशन ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामात अनेक अडथळे येत आहेत.
शहराची वाढती लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून निओमेट्रो रेल्वे सुरू व्हावी, यासाठी स्मार्ट सिटीकडून प्रयत्न केले जात आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर महामेट्रोने सादरीकरण केले होते. त्यानंतर शुक्रवारी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी वाळूज ते शेंद्रापर्यंतच्या अखंड उड्डाणपुलाच्या डीपीआरचे सादरीकरण केले. डॉ. चौधरी यांनी नंतर पत्रकारांना माहिती दिली.
डॉ. चौधरी म्हणाले, दोन टप्प्यात मेट्रोचे काम केले जाणार आहे. पहिला टप्पा शेंद्रा ते रेल्वे स्टेशन असा असेल. यात शेंद्रा - चिकलठाणा - सिडको बसस्थानकाचा चौक - क्रांती चौक - उस्मानपुरा - रेल्वे स्टेशन असा मार्ग राहील, तर दुसऱ्या टप्प्यात रेल्वे स्टेशन ते हर्सूल टी पॉइंट असे काम करण्याचे नियोजन आहे. रेल्वे स्टेशन - महावीर चौक - मध्यवर्ती बसस्थानक - ज्युबली पार्क - रंगीन गेट - जिल्हाधिकारी कार्यालय - दिल्ली गेट हर्सूल टी पॉइंट असा मार्ग असणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मार्गात काही वारसास्थळे आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणांच्या जवळून मेट्रो जाणार आहे. त्यामुळे या मार्गात बरीच वळणे आहेत शिवाय वारसास्थळांचादेखील प्रश्न आहे. त्यांना सुरक्षित ठेवून काम करावे लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याचा विचार तूर्त बाजूला ठेवून पहिल्या टप्प्यावर काम करण्यास अनुकूलता दाखवण्यात आली.
मार्चमध्ये पुन्हा सादरीकरण
डीपीआर तयार झाल्यावर मार्च महिन्यात त्याचे सादरीकरण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या समोर केले जाईल. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
छावणीच्या जागेची अडचण
महावीर चौकापासून पुढे मेट्रोची वाढलेली उंची लक्षात घेऊन लष्कराकडून परवानी मिळेल किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन आणि दुसऱ्या टप्प्यात रेल्वे स्टेशन ते वाळूज असाही पर्याय निवडला जाऊ शकतो, असे चौधरी यांनी सांगितले.