‘एमटीडीसी’चे नवे व्हिजन; अजिंठ्याला थीम पार्क-मेडिटेशन सेंटर, जायकवाडीत वाॅटर स्पोर्ट
By संतोष हिरेमठ | Published: September 25, 2024 07:30 PM2024-09-25T19:30:54+5:302024-09-25T19:31:18+5:30
पर्यटननगरीत पर्यटकांचा मुक्काम वाढविण्यावर भर
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) आता नवीन व्हिजन समोर ठेवून पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे थीम पार्क, मेडिटेशन सेंटर, वाॅटर पार्क सुरू करण्यासाठीही चाचपणी सुरू आहे. कोयना जलाशयाप्रमाणे जायकवाडीतही वाॅटर स्पोर्ट सुरू होईल का, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. यातून पर्यटकांचा मुक्काम वाढण्यास मदत होईल, असे ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले.
शहरात आलेल्या सूर्यवंशी यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. पर्यटन वाढीसाठी ‘एमटीडीसी’कडून सुरू असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. पर्यटकांना आकर्षित करण्यावर आता भर दिला जात आहे. अजिंठा लेणी येथे खूप जागा आहे. याठिकाणी नवीन काही करता येईल, यासाठी नियोजन करीत आहेत.
वेरूळला आल्यानंतर पर्यटकांनी वाॅटर स्पोर्टसाठी जायकवाडीलाही गेले पाहिजे, असा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन चाचपणी केली जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही काही प्रस्ताव आल्यास विचार केला जाईल, असे सूर्यवंशी म्हणाले.
रेस्टाॅरंट, पर्यटक निवासांवरून आता पर्यटन सुविधांकडे
सूर्यवंशी म्हणाले, सुरुवातीच्या काळात पर्यटक निवासांची गरज होती. ही गरज ‘एमटीडीसी’ने पूर्ण केली. गेल्या काही वर्षांत पर्यटक निवास, रेस्टाॅरंटची संख्या वाढली आहे. त्यामुळे ‘एमटीडीसी’ रेस्टाॅरंट, पर्यटक निवासांवरून आता पर्यटन सुविधा वाढीकडे लक्ष देत आहे. बोट क्लब, वाॅटर स्पोर्टसह अनेक बाबी आणत आहोत.
रेस्टाॅरंट होणार थ्री, फोर अन् फाईव्ह स्टार
‘एमटीडीसी’च्या रेस्टाॅरंटचे आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला. यातून हे रेस्टाॅरंट थ्री, फोर आणि फाईव्ह स्टारमध्ये बदलतील. त्यातून पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळतील, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.