शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राहणार नवीन मतदार यादी
By विजय सरवदे | Published: September 27, 2022 08:19 PM2022-09-27T20:19:25+5:302022-09-27T20:20:10+5:30
पूर्वीचे मतदार रद्द : १ ऑक्टोबरपासून नव्याने करावी लागणार नोंदणी
औरंगाबाद : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यापूर्वीची मतदार यादी रद्द झाली असून, पूर्णत: नवीन मतदारयादी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी पात्र शिक्षकांची आता नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शिक्षक मतदार नोंदणीचा कालावधी आहे. या मतदार नोंदणी अभियानात शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे यांनी केले आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होतात. या निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येकवेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. त्यानुसार १ नोव्हेंबरच्या अगोदर लगतच्या सहा वर्षांत किमान तीन वर्षे शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत शिक्षक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. मतदार नोंदणीचे अर्ज विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. अर्जासोबत विहीत नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. शिक्षक मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीसंबंधी दावे व हरकती घेण्याचा कालावधी २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान असेल. २५ डिसेंबर रोजी दावे व हरकती निकालात काढल्या जातील आणि अंतिम मतदारयादी ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या मतदार नोंदणी अभियानात शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे यांनी केले आहे.
नोंदणी करताना ही घ्यावी काळजी
मतदार नोंदणी अर्ज मराठीत भरावा. अर्जासोबत आधार कार्ड व मतदान ओळखपत्राची झेरॉक्स प्रत जोडावी. व्हाईट बॅक ग्राऊंडवर दोन्ही कान दिसतील असा कलर पासपोर्ट फोटो अनिवार्य असेल. प्रथम नियुक्ती दिनांकापासून नोव्हेंबर २०२२ पर्यंत ज्यांची तीन वर्षे सेवा होते, असे शिक्षक अर्ज भरू शकतात. १ नोव्हेंबर २०१९ पासून पुढे निवृत्त झालेले शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात.