पीएचडी संशोधनासाठी उजाडले अखेर नवीन वर्ष;तांत्रिक बाबींमुळे याद्यांना झाला उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 12:13 PM2022-01-01T12:13:58+5:302022-01-01T12:16:48+5:30

नंतर विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत, यासाठी अत्यंत बारकाईने तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येत आहे.

New Year finally dawned for Phd research; Lists of eligible students announced on the website | पीएचडी संशोधनासाठी उजाडले अखेर नवीन वर्ष;तांत्रिक बाबींमुळे याद्यांना झाला उशीर

पीएचडी संशोधनासाठी उजाडले अखेर नवीन वर्ष;तांत्रिक बाबींमुळे याद्यांना झाला उशीर

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘पेट’ पात्र, तसेच ‘पेट’मधून सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. अर्थात संशोधनासाठी वर्षभर तपश्चर्या करावी लागली. पीएच.डी.साठी पात्र विद्यार्थ्यांच्या याद्या जाहीर करण्यासाठी आज- उद्या करीत अखेर विद्यापीठाने नवीन वर्षाचा मुहूर्त साधला. शनिवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर याद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले.

संशोधनासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी २० डिसेंबर रोजी सोमवारीच जाहीर होणार होती; परंतु शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासनाला ती जाहीर करता आली नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर तीन दिवसांनीही विद्यापीठाला याद्या जाहीर करता आल्या नाहीत. तथापि, पीएच.डी.साठी पात्र ठरलेले विद्यार्थी आणि उपलब्ध गाइड यांचा ताळमेळ लागत नसल्यामुळे प्रकुलगुरू डॉ. शिरसाठ, पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा, तसेच सर्व अधिष्ठाता यांनी एकत्रितपणे तांत्रिक बाबी तपासल्या. तेव्हा अनेक विषयांसाठी गाइडच उपलब्ध नसल्याचे समोर आले. 

एकदा पीएच.डी.साठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आणि त्याला गाइडची अडचण आली, तर ती विद्यापीठाची सर्वस्व जबाबदारी असते. त्यामुळे याद्या जाहीर करण्यापूर्वीच सर्व त्रुटी पूर्ण करण्याचे धोरण प्रशासनाने आखले होते. मावळत्या वर्षात जानेवारी २०२१ आणि मार्चमध्ये विद्यापीठाने ४५ विषयांसाठी पीएच.डी. प्रवेशपूर्व घेतली होती. ‘पेट’मध्ये ४ हजार ८८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सप्टेंबर महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या मुलाखती सुरू झाल्या. या विद्यार्थ्यांपैकी गुणवत्ता यादीनुसार पीएच.डी. करण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादीला विलंब होत असल्यामुळे विद्यार्थ्यांची घालमेल सुरू होती.

दोन दिवसांत याद्या ‘अपलोड’
यासंदर्भात प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत काही विषयांच्या याद्या संकेतस्थळावर अपलोड केल्या जातील. उर्वरित विषयांच्या सर्व याद्या शनिवारी जाहीर केल्या जातील. नंतर विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत, यासाठी अत्यंत बारकाईने तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे थोडासा विलंब झाला.

Web Title: New Year finally dawned for Phd research; Lists of eligible students announced on the website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.