नवे वर्ष.. नव्या संकल्पना...
By Admin | Published: January 1, 2015 12:19 AM2015-01-01T00:19:58+5:302015-01-01T00:26:34+5:30
लातूर : नवे वर्ष आले की त्याचे स्वागत करताना प्रत्येकजण उत्साहाने वेगवेगळे संकल्प सोडतो. कुणाच्या तडीस जातात, तर कोणाच्या काही दिवसातच ढेपाळतात.
लातूर : नवे वर्ष आले की त्याचे स्वागत करताना प्रत्येकजण उत्साहाने वेगवेगळे संकल्प सोडतो. कुणाच्या तडीस जातात, तर कोणाच्या काही दिवसातच ढेपाळतात. पण तरीही वर्ष सरले की, नव्या वर्षाची पहाट उगवते ती नवे संकल्प घेऊनच. त्यासोबत असते नवी आशा... नवी महत्वाकांक्षा... प्रशासनातील अधिकारी आणि स्थानिक संस्थांच्या लोकप्रतिनिधींनीही लातूरच्या भल्याचा संकल्प केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा मनोदय व्यक्त केला असून, मनपा आयुक्तांनी ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर...’, तर जि.प.च्या सीईओंनी शासकीय योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी नागरिक आणि पोलिसांतील संवाद वाढविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
कधी पाऊस नसल्यामुळे तर कधी अतिपाऊस झाल्यामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या ना त्या कर्जाचा बोजा त्याच्या सातबारावर आहे. नव्या वर्षात शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा राहणार नाही, यादृष्टीने आम्ही पावले उचलली आहेत. २०१५ मध्ये जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली राहणार नाही. त्यासाठी वर्षभर बँक, कृषी विभाग, सोसायट्या आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला जाईल. शिवाय, आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची योजनाही स्थानिक पातळीवर राबविण्याचा मनोदय आहे. लोकसहभागातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ची मोहीम राबविली जाणार आहे. शिवाय, सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याचा संकल्प आहे. दुष्काळमुक्त जिल्हा करण्याचा संकल्प असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बराच काळ गेल्याने गतवर्षी काम तेवढे झाले नसले, तरी १३३ कोटींची वर्कआॅर्डर, सिटीबसची मंजुरी, ७० टक्के प्लास्टिक मुक्ती, पे अॅण्ड पार्क, मालमत्तेचे सर्वेक्षण आदी कामे समाधानकारक झाली आहेत. नूतन वर्षात मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. मालमत्ता करातून मोठा महसूल मनपाला मिळू शकतो. मात्र सध्या असलेली मालमत्ताधारकांची संख्या बरोबर नाही. त्यासाठी सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे. त्यातून तीन ते चारपट महसुलाची वाढ होईल. एलबीटीची वसुलीही चालू वर्षात अधिक प्रभावीपणे केली जाईल. अतिक्रमणाची मोहीम जुन्या वर्षातील असली तरी ती नियमित ठेवली जाईल. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करून फेरीवाल्यांना फिक्स जागा करून देण्यात येणार आहे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो अनधिकृत बांधकामाचा आहे. या वर्षात कठोर कारवाई करून अनधिकृत बांधकामे हटविली जातील, असा संकल्प मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व योजना गावा-गावांत पोहोचविण्याचा मानस आहे. या जिल्हा परिषदेने देशात स्थान मिळविले आहे. ते स्थान नूतन वर्षात टिकविणे हाच आमचा संकल्प आहे. शासनाच्या विविध योजना, त्याचा लाभ गावातील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासनाच्या माध्यमातून यशस्वीपणे करू. जलयुक्त शिवार हा नवीन उपक्रमही राबविणार असल्याचे जि.प.चे सीईओ दिनकर जगदाळे यांनी सांगितले.
पोलिस-नागरिकांतील संवाद दुरावला आहे. सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे ठिक नाही. त्यामुळे समाजातील विविध घटकांचा पोलिसांशी संवाद वाढविण्यावर २०१५ मध्ये भर दिला जाईल. पोलिस आणि नागरिकांत मैत्रीचे नाते निर्माण झाल्यास गुन्हेगारीवर वचक बसेल. गुन्ह्यांचा क्ल्यूही मिळू शकतो, असे पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.
लातूर शहरातील कचरा टाकण्यासाठी डेपोची अडचण निर्माण झाली आहे. आता नव्या वर्षात नवा डेपो करण्याचा मानस आहे. त्यासाठी ४० एकर जमीन आम्ही पाहिली आहे. ती लवकरच घेण्याचा प्रयत्न आहे. पाण्याची टंचाई लक्षात घेता भंडारवाडीचे टेंडर नव्या वर्षात मंजूर केले जाईल. शिवाय, मनपाची आर्थिक सुधारण्यासाठी १०० टक्के वसुली मोहीम हाती घेतली जाणार असून, ‘सुंदर शहर, स्वच्छ शहर’ करण्याचा मानस नव्या वर्षात साकारला जाईल, असा विश्वास महापौर अख्तर मिस्त्री यांनी व्यक्त केला.