बिडकीन डीएमआयसीमध्ये अवनी पॉवर करणार १० हजार ५२१ कोटी रुपयांची गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:35 IST2025-01-13T11:33:58+5:302025-01-13T11:35:12+5:30
आणखी २२ कंपन्या डीएमआयसीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक

बिडकीन डीएमआयसीमध्ये अवनी पॉवर करणार १० हजार ५२१ कोटी रुपयांची गुंतवणूक
छत्रपती संभाजीनगर : ऑरिक सिटींतर्गत दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात गतवर्षी टोयोटा-किर्लोस्कर मोटार्ससह जेएसडब्ल्यू, लुब्रिझोल आणि एथर एनर्जींनी प्रकल्प उभारण्याचे जाहीर केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन २२ उद्योग येण्यास उत्सुक आहेत. जपानची त्सुशो कॉर्पोरेशन आणि ट्रान्ससिस्टम लॉजिस्टिक इंटरनॅशनल कंपनी आणि जर्मनीच्या सिमेन्स कंपनीने येथे गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली. यासोबतच लिथिनिअम बॅटरी सेल उत्पादन करणाऱ्या जेनसोल ग्रुपच्या अवनी पॉवर कंपनीने येथे तब्बल १० हजार ५२१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. या कंपन्या येथे येत असल्याने मराठवाड्यासाठी नवे वर्ष गुंतवणुकीचे असल्याचे संकेत आहेत.
ऑरिक सिटीच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात आता केवळ ४६९ एकर ३९ गुंठे जमीन उरली आहे. मोजकीच औद्योगिक जमीन उपलब्ध असताना जपानच्या त्सुशो कॉर्पोरेशन कंपनीने ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली. या कंपनीने ७५ एकर जमिनीची मागणी केली आहे. ही कंपनी बिडकीनमध्ये ६५० लोकांना रोजगार उपलब्ध करणार आहे. जपानी कंपनी ट्रान्ससिस्टम लॉजिस्टिक इंटरनॅशनलने ऑरिककडे ५८ एकर जमिनीची मागणी केली. ही कंपनी येथे ४ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. सुमारे ३ हजार रोजगार उपलब्ध केल्याचे ऑरिककडून समजले. याशिवाय मॅट्रिक गॅस या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील कंपनीने बिडकीनमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी १३६ एकर जमिनीची मागणी केली आहे. ही कंपनी येथे ९ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, ४ हजार जणांना रोजगार देणार आहे, तर जर्मनीच्या सिमेंन्स कंपनीने २५ एकर जमिनीची मागणी नोंदविली. कंपनी येथे २५०० कोटींची गुंतवणूक करणार असून, सुमारे १२०० लोकांना रोजगार उपलब्ध करणार आहे. अवनी पॉवरने बिडकीनमध्ये १० हजार ५२१ कोटी रुपयांची गुंतवणुकीची तयारी दर्शवित १५८ एकर जमिनीची मागणी केली आहे.
आणखी या कंपन्याही येण्याची शक्यता (कंसात त्यांची गुंतवणुकीची रक्कम)
फिंडाबिलटी सायन्सेस प्रा.लि. - २० कोटी
ह्योसंग कॉर्पेारेशन प्रा.लि. - २५२० कोटी
मरुबेनी-इटोची स्टील इंडिया.प्रा.लि. - २०० कोटी.
एमटीसी ग्रुप- ३००० कोटी
रेलिक मटेरियल प्रा.लि. - ५० कोटी
निप्पोन एक्स्प्रेस लॉजिस्टिक लि. - १०० कोटी
महिंद्रा एस्सीलो - ३०० कोटी.
केमबॉण्ड मटेरियल टेक्नॉलॉजी प्रा.लि. - १२५ कोटी.
ट्रेक्स् एनर्जी प्रा.लि. - १००० कोटी.
इंडो ऑटो टेक प्रा.लि. - ३०० कोटी.
ट्रान्ससिस्टम लॉजिस्टिक प्रा. लि. - ३५० कोटी
टोयोटा-किर्लोस्कर कंपनीला स्कील ट्रेनिंग सेंटरसाठी ५० एकर
डीएमआयसीच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात टाेयोटा-किर्लोस्कर मोटार्सने ८१७ एकरवर प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेतला. आता स्कील ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी कंपनीने बिडकीनमध्ये ५० एकर जमिनीची मागणी केल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली.