नवनिर्वाचित ८४ सदस्यांवर येणार गंडांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:05 AM2021-04-02T04:05:36+5:302021-04-02T04:05:36+5:30
सोयगाव : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा खर्च सादर न केलेल्या ८४ सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार असल्याचे संकेत दिसत आहेत. नव्याने ग्रामपंचायतीत ...
सोयगाव : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा खर्च सादर न केलेल्या ८४ सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार असल्याचे संकेत दिसत आहेत. नव्याने ग्रामपंचायतीत पदार्पण केलेल्या सदस्यांनी निवडणुकीचा खर्च वेेळेत सादर केला नसल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईची शिफारस जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सोयगाव तालुक्यात जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तब्बल ७९८ उमेदवार रिंगणात उभे होते. त्यापैकी १३१ उमेदवारांनी वारंवार संधी देऊनही निवडणुकीदरम्यान झालेल्या खर्चाचा ताळमेळ सादर केला नाही. त्यामुळे १३१ उमेदवारांना तालुका निवडणूक विभागाकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या. या नोटिसांनंतरही उमेदवारांनी आपला खुलासा सादर करून संबंधित खर्च सादर करण्याची संधी निवडणूक आयोगाने दिली होती. यात ४७ उमेदवारांचा खर्च खुलाशासह आला. मात्र, ८४ जणांचा अहवाल आला नसल्याने त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यात ८४ सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने यासंबंधी कधी आणि काय निर्णय घेण्यात येतो, याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे.
------- पोटनिवडणुका होणार -------
सोयगाव तालुक्यात खर्च सादर न करणाऱ्या ८४ सदस्यांवर अपात्रतेची कारवाई झाल्यास त्या ठिकाणी पोटनिवडणुका होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. संबंधित ८४ सदस्य अपात्र ठरल्यावर त्यांना पुढील सहा वर्षे ग्रामपंचायतीसह इतर कुठलीच निवडणूक लढविता येणार नसल्याचा नियम आहे.
------ चौकट ----
निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उपकोषागार अधिकारी नजीर शेख, लिपिक विश्वास सेवलीकर यांच्या पथकांनी कामकाज पाहिले होते. उमेदवारी खर्च सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने १८ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली होती. मात्र, सोयगाव तालुक्यातील ८४ सदस्य निवडणुकीचा खर्च सादर करण्यात अपयशी ठरले आहेत.