स्वप्न राहिले अधुरे ! दरोडेखोरांच्या मारहाणीत नवविवाहित पती ठार, पत्नी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 07:26 PM2021-07-02T19:26:35+5:302021-07-02T19:33:31+5:30
राजेंद्र याचा विवाह जानेवारी महिन्यात भायगाव येथील अंभोरे कुटुंबियातील मोनिका हिच्याशी झाला होता.
वैजापूर ( औरंगाबाद ) : तालुक्यातील खंबाळा शिवारातील शेतवस्तीवर चोरीच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी नवविवाहित पती-पत्नीला लाकडासह धारदार हत्यारांनी जबर मारहाण केली. या घटनेत पतीचा जागेवर मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी असून बेशुद्धावस्थेत आहे. राजेंद्र जिजाराम गोरसे (२६) असे मयताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
वैजापूर श्रीरामपूर रस्त्यावरील खंबाळा फाटा शिवारातील शेतवस्तीवर जिजाराम राधाजी गोरसे हे कुटुंबियांसह राहतात. त्यांचा मुलगा राजेंद्र याचा विवाह जानेवारी महिन्यात भायगाव येथील अंभोरे कुटुंबियातील मोनिका हिच्याशी झाला होता. जिजाराम त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा व सून असे पाच जण शेतवस्तीवर राहतात. आजूबाजूला बऱ्याच वस्त्या असल्याने परिसर गजबजलेला असतो. नेहमी प्रमाणे गुरुवारी रात्री गोरसे कुटुंबियांनी जेवण केले. यानंतर राजेंद्र व मोनिका हे एका खोलीत तर अन्य कुटुंब दुसऱ्या खोलीत झोपले होते. रात्री १ वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी मागील बाजूने घरात प्रवेश केला. राजेंद्रच्या खोलीत प्रवेश करून त्यांनी राजेंद्र व मोनिका यांच्यावर झोपेतच लाकूड व तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. यात राजेंद्र जागीच ठार झाला. तर मोनिका गंभीर जखमी झाली. आवाजामुळे जिजाराम हे जागे झाले. खोलीचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी खिडकीतून जोरजोराने आरडाओरड केली. परिसरातील नागरिक येत असल्याचे पाहून दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले.
जिजाराम यांनी राजेंद्रच्या खोलीत जाऊन पाहिले असता, दोघे पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी तपासून राजेंद्रला मयत घोषीत केले.तर मोनिका हिस बेशुद्धावस्थेत औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती, संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. भागवत फुंदे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पथकाला पुरणगाव रस्त्यावर एक दुचाकी बेवारस आढळली आहे. या प्रकरणी जिजाराम गोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेउनि. विजय जाधव हे करीत आहेत.