सासू , नणंदेचे टोमणे जिव्हारी लागल्याने नवविवाहिता जीव देण्यास गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 17:09 IST2021-03-10T17:07:04+5:302021-03-10T17:09:22+5:30
newlyweds girl trying to suicide सासू, नणंदेच्या छळामुळे आत्महत्येसाठी तलावावर आलेल्या नवविवाहितेला दामिनी पथकाने वाचविले

सासू , नणंदेचे टोमणे जिव्हारी लागल्याने नवविवाहिता जीव देण्यास गेली
औरंगाबाद : सासू आणि नणंद चांगली वागणूक देत नसल्याने नैराश्य आल्यामुळे आत्महत्येचा विचार करीत हर्सूल तलावावर फिरणाऱ्या नवविवाहितेला वाचविण्यात दामिनी पथकाला मंगळवारी दुपारी यश आले.
ग्रामीण भागातील रहिवासी असलेली तरुणी स्वाती (नाव बदलले) दोन महिन्यांपूर्वी लग्न झाल्यामुळे ती सासरी नांदावयाला आली. तिचा पती कामावर जातो. तो अत्यंत प्रेमळ आहे. मात्र, तिची सासू आणि अविवाहित नणंद किरकोळ कारणावरून तिला टोमणे मारतात. दुय्यम वागणूक मिळत असल्यामुळे ती खिन्न झाली. आज पहाटे पाच वाजता ती घरातून बाहेर पडली आणि चालत चालत हर्सूल तलावावर आली. ती तलावावर घुटमळत असल्याचे पाहून परिसरातील एका जागरूक महिलेने ही बाब दामिनी पथकाला कळविली. सकाळी साडेदहा वाजता पथकाने तिला गाठले. सुरुवातीला सुमारे तासभर ती बोलतच नव्हती. तिला विश्वासात घेतल्यावर तिने हकीकत सांगितली. घरी परत जायचे नाही आणि माहेरीही जाणार नाही, असे ती म्हणत होती. बोलताना तिने तिचा पती चांगला असल्याचे सांगितले.
समुपदेशनानंतर सोडले घरी नेऊन
दामिनीच्या उपनिरीक्षक स्नेहा करेवाड यांनी तिला हर्सूल पोलीस ठाण्यात नेऊन तिचे समुपदेशन केले तेव्हा तिने आपण सासरच्या जाचाला कंटाळून नव्हे तर आपले माहेर हे लांब आहे. पती चांगला असल्यामुळे आत्महत्येचा निर्णय डोक्यातून काढत असल्याचे तिने मान्य केले. यानंतर तिच्या सासरचा शोध घेऊन तिला सासरच्या मंडळीकडे सुपुर्द करण्यात आले. ही कारवाई महिला अंमलदार लता जाधव, आशा गायकवाड, साक्षी संगमवाड यांनी केली़