सुसाट वाहनाने उडविलेल्या वृत्तपत्र विक्रेत्याची मृत्यूशी झुंज थांबली, मुजोर चालक अद्यापही पसार
By सुमित डोळे | Published: June 20, 2024 06:40 PM2024-06-20T18:40:42+5:302024-06-20T18:41:28+5:30
अतिवेगाचा आणखी एक बळी, अपघाताच्या पाच दिवसांनंतर मुजोर चालक अद्यापही पसार
छत्रपती संभाजीनगर : शहरातील जालना रोडवर वाहनांच्या अतिवेगाचा आणखी एक बळी गेला आहे. शनिवारी पहाटे सुसाट चारचाकीने उडविलेले वृत्तपत्र विक्रेते प्रशांत श्रीराम थोरात (५५, रा.राजाबाजार) यांची पाच दिवसांनी अखेर मृत्यूशी झुंज संपली. बुधवारी सकाळी त्यांचा रुग्णालयात उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला.
जालना रोडवर आता दिवसासह रात्रीही वाहने सुसाट दामटली जातात. वाहनांची संख्या वाढलेली असताना रस्ता मात्र अरुंद झाला, परंतु त्या तुलनेत सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, पोलिसांकडून आवश्यक उपाययाेजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी, सातत्याने अपघाती मृत्यूंची संख्या वाढत गेली. आठवड्याभरापूर्वी विद्यार्थी व वृद्धेच्या मृत्यूने संताप व्यक्त होत होता. त्यातच १५ जून रोजी पहाटे ४:३० वाजता थोरात मोंढा नाका उड्डाणपुलाखालून आकाशवाणीच्या दिशेने जात हाेते. याच वेळी पुलावरून सुसाट आलेल्या फिकट काळ्या रंगाच्या (एम एच २० एफडब्ल्यु - ९००७) कारने त्यांना धडक देऊन पोबारा केला. यात थोरात लांब फेकले गेले. डोके, छातीला गंभीर जखम झाली. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी मात्र थोरात यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात आई, पत्नी शिल्पा, मुले विराज, सुजल, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.
मुजाेर चालक पसार
धडकेनंतर थोरात लांब फेकले जाऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मात्र, मुजाेर कार चालकाने त्यांना गंभीर अवस्थेत सोडून पोबारा केला. जिन्सी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाला कुठल्याही परिस्थिती अटक होईल. सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक तपास करून चालक निश्चित करून लवकरच अटक करू, असे जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले.