येत्या ५ वर्षांत राज्य दुष्काळमुक्त होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:45 PM2018-04-30T12:45:39+5:302018-04-30T12:48:12+5:30

ध्येयाने झपाटून सातत्यपूर्ण काम होत राहिले तर येत्या ५ वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, असा आशावाद बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी येथे व्यक्त केला. 

In the next 5 years the state will be drought-free | येत्या ५ वर्षांत राज्य दुष्काळमुक्त होईल

येत्या ५ वर्षांत राज्य दुष्काळमुक्त होईल

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय जैन संघटनेच्या ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ कार्याचा आढावा घेण्यासाठी रविवारी जिल्हा परिषदेतील सभागृहात बैठक घेण्यात आली. पाणी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना (बीजेएस) आदी संस्थेच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे.

औरंगाबाद : पाणी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना (बीजेएस) आदी संस्थेच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. यात राज्यातील ५ हजार गावांनी सहभाग घेतला आहे. यातील ३ हजार गावे श्रमदानाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करतील. या स्पर्धेमुळे गावागावांत अपूर्व उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. गावकरीच नव्हे तर राजकीय नेते, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी या श्रमदानात सहभागी होत आहेत. अशाच ध्येयाने झपाटून सातत्यपूर्ण काम होत राहिले तर येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रदुष्काळमुक्त होईल, असा आशावाद बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी येथे व्यक्त केला. 

भारतीय जैन संघटनेच्या ‘दुष्काळमुक्तमहाराष्ट्र’ कार्याचा आढावा घेण्यासाठी रविवारी जिल्हा परिषदेतील सभागृहात बैठक घेण्यात आली. तेव्हा त्यांनी राज्यात लोकचळवळीतून दुष्काळमुक्तीचे किती मोठे काम उभारले जातेय याची माहिती दिली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे आदींची उपस्थिती होती. शांतीलाल मुथा यांनी सांगितले की, जे गाव  वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहे. पाणी फाऊंडेशनने ठरवून दिलेल्या श्रमदानाचा टप्पा ज्या गावांनी पूर्ण केला आहे, अशा गावांना बीजेएस पोकलेन व जेसीबी देणार आहे. स्पर्धा ८ एप्रिल रोजी सुरू झाली असून, २२ मे रोजी संपणार आहे.

आजपर्यंत संघटनेने ६५० पोकलेन व जेसीबी सुरू केल्या आहेत. ३ हजार गावांमध्ये ३ हजार पोकलेन व जेसीबी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. २२ मेपर्यंत सुमारे ६ लाख २५ हजार तास जेसीबी चालणार आहेत. यासाठी राज्यातूनच नव्हे तर कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड या राज्यांतूनही जेसीबी मागविण्यात आल्या आहेत. याशिवाय ज्या गावात जेसीबी व पोकलेन आहेत त्यांचाही वापर करून घेण्यात येत आहे.  बीजेएसचे राज्य अध्यक्ष अ‍ॅड. गौतम संचेती म्हणाले की, या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संघटनेने संपूर्ण प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी मुख्य कार्यालयामध्ये १६ जणांचे पथक नियुक्त केले आहे. ७५ तालुक्यांत १०० तालुका समन्वयक नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी  संघटनेचे पारस चोरडिया, पारस बागरेचा, किशोर ललवाणी, प्रवीण पारख, प्रफुल्ल श्रीश्रीमाळ, प्रकाश कोचेटा यांची उपस्थिती होती. 

प्रत्येक गावाला डिझेलसाठी शासन देणार दीड लाख 

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले की, वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक गावाला डिझेलपोटी राज्य शासन दीड लाख रुपये देणार आहे. त्याचा वापर गावकऱ्यांनी पोकलेन व जेसीबीच्या इंधनासाठी करावा. स्पर्धेच्या निमित्ताने सुरू झालेली लोकचळवळ गाव दुष्काळमुक्त झाल्यावरच संपवावी, असे आवाहन त्यांनी केले. या स्पर्धेत फुलंब्री, खुलताबाद व वैजापूर या तालुक्यांतील १६२ गावे सहभागी झाली असून, लोकचळवळीतूनच अशा योजना यशस्वी होऊ शकतात, असे आ. प्रशांत बंब यांनी नमूद केले. 

महाश्रमदान १ मे रोजी  
या स्पर्धेनिमित्त राज्यातील ५ हजार गावांमध्ये १ मे रोजी महाश्रमदान मोहीम राबविण्यात येणार आहे. यात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, विविध स्वयंसेवी संस्थेचे सदस्य, गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. श्रमदान करण्यासाठी, खेड्यात जाण्यासाठी राज्यातील दीड लाख शहरवासीयांनी नोंदणी केल्याची माहिती शांतीलाल मुथा यांनी दिली.

Web Title: In the next 5 years the state will be drought-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.