दुसऱ्या दिवशी मनपाने कापले १२७ अनधिकृत नळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 05:46 PM2019-06-28T17:46:17+5:302019-06-28T17:48:17+5:30
पथकांनी पहाटे ६ वाजेपासून शहरातील विविध भागांत कारवाई सुरू केली.
औरंगाबाद : महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून घेण्यात आलेल्या अनधिकृत व्यावसायिक नळांवर गुरुवारी दुसऱ्या दिवशीही कारवाई करण्यात आली. शहरातील मुख्य व्यावसायिक भागात मनपाच्या ७ पथकांनी कारवाई करून १२७ अनधिकृत नळ कापले.
पथकांनी पहाटे ६ वाजेपासून शहरातील विविध भागांत कारवाई सुरू केली. कारवाई करताना नागरिक आणि पालिकेच्या पथकात वाद होऊन तणाव निर्माण झाला. चिकलठाणा परिसरात मातोश्री लॉन्स, कांचन लॉन्स, शिवनेरी रेस्टॉरंट, शिवनेरी लॉन्स, आॅक्सिफ्लो आर ओ प्लांट, इंडियन आॅईल पेट्रोलपंप, निसर्ग हॉटेल, हनुमाननगर येथील आॅटो वॉशिंग सेंटर, आशादीप रेस्टॉरंट व बार या व्यावसायिकांचे अनधिकृत नळ कनेक्शन पथकाने कापले. तसेच एमजीएमसमोर हॉटेल शालिमार, रॉयल गॅरेज, गुलाम मोटर गॅरेज, हॉटेल प्रशांत, लक्की गोल्ड फर्निचर, हॉटेल रसोई जकात नाका आणि एमजीएम गेट समोरील आदर्श महिला बँकेचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. महापालिकेच्या पथकाने नंतर कांचनवाडी येथील धील्लन, मिथियाल आणि नाथपुरम येथील घेण्यात आलेले अनधिकृत नळ कनेक्शनही तोडण्यात आले. मोंढानाका भागात हॉटेल साई प्रसाद, बिरला सिमेंट आणि एन-२ भागात जयभवानी पेट्रोलपंप, सलीम खुर्चीवाला, चंद्रलेखा परमिट रूम अॅण्ड बार तसेच शहागंज येथील सिटी प्लाझा व्यापारी संकुल, पेट्रोलपंप आणि भाजी मंडई येथील पाणपोईचे नळ पथकांनी तोडले.
नळ कनेक्शन रात्रीतून पुन्हा जोडले
मोतीकारंजा परिसरात एका धार्मिकस्थळात मुख्य जलवाहिनीवरून बेकायदा घेतलेले दीड इंचाचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई पालिकेने बुधवारी केली होती. मात्र मनपाने तोडलेले नळ कनेक्शन त्या धार्मिकस्थळावरील मंडळींनी रात्रीतून जोडून पुन्हा पाणीपुरवठा सुरू केला. नळ कनेक्शन पुन्हा जोडल्याची माहिती मिळताच गुरुवारी सकाळी पथक कारवाईसाठी धार्मिकस्थळावर धडकले. नळाच्या पाण्याने टँकर भरणा होत असल्याचे पालिका पथकाने रंगेहाथ पकडले. नळ कनेक्शनवर कारवाईस विरोध करण्यासाठी जमाव पथकावर चालून आला. परंतु उपायुक्त मंजूषा मुथा यांनी थेट धार्मिकस्थळात जाऊन बेकायदा जोडलेले नळ कनेक्शन पुन्हा तोडले. पोलीस बंदोबस्त असल्यामुळे तणाव निवळला.
रॅकेट सर्वानुमतेच चालत असावे
पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर नळ कनेक्शन कुणी जोडून दिले. पाणीपुरवठा विभागातील महाभागच याला जबाबदार आहेत का? आजवर या कनेक्शनला अभय कुणी दिले. मनपाचे प्लंबर, उपअभियंता, शाखा अभियंता ही मंडळी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने मुख्य जलवाहिनीवर नळ कनेक्शन दिल्याचे बोलले जाते. पाणीपुरवठा विभागातील यंत्रणेला वरकमाई आणि लोकप्रतिनिधींना निवडणुकीसह वॉर्डातील पक्षांच्या कार्यक्रमांसाठी अनधिकृत व्यावसायिक नळधारकांकडून गंगाजळी मिळते. त्यामुळे मनपासह राजकारणीदेखील अनधिकृत व्यावसायिक नळांची पाठराखण करतात, अशी चर्चा ऐकायला मिळाली.