दुसऱ्या दिवशी परीक्षा झाल्या सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 02:58 PM2020-10-11T14:58:44+5:302020-10-11T14:59:21+5:30
मुंबई, पुणे, सोलापूर विद्यापीठांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सर्व्हर हे दुप्पट क्षमतेचे असल्यामुळे ते क्रॅश होणार नाही व ऑनलाईन परीक्षेत व्यत्ययही येणार नाही, असा विश्वास कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद : मुंबई, पुणे, सोलापूर विद्यापीठांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सर्व्हर हे दुप्पट क्षमतेचे असल्यामुळे ते क्रॅश होणार नाही व ऑनलाईन परीक्षेत व्यत्ययही येणार नाही, असा विश्वास कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला. दरम्यान दुसऱ्या दिवशी शनिवारी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा सुरळीत पार पडल्या.
डॉ. बा. आं. म. विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेची लिंक ओपन झाली नाही. काहींना दुसऱ्याच विद्याशाखेचे पेपर आले, तर काही महाविद्यालयांनी असहकार्याची भूमिका घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता.
त्यामुळे पुढील परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी विद्यापीठ स्तरावर ३२ आयटी कॉर्डिनेटर व १२ संवैधानिक अधिकारी तैनात केले आहेत. याशिवाय विभागातील ३३० केंद्रांवर संबंधित महाविद्यालयातील प्रत्येकी दोन- दोन आयटी कॉर्डिनेटरच्या नियंत्रणाखाली या ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या.