निखालस ‘आरोग्य’ संगीतासाठी शरीररूपी दर्जेदार वाद्य गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:14 AM2018-02-13T00:14:11+5:302018-02-13T00:14:20+5:30
शरीराची उंची वाढविणे हा जीवनाचा अंतिम हेतू नसून जगण्याचा दर्जा वाढविणे म्हणजे आयुष्य असते. अशा दर्जेदार आयुष्यासाठी आपले आरोग्य सदृढ असणे महत्त्वाचे. आपले शरीर हे जर वाद्य असेल तर आरोग्य त्याचे संगीत आहे. त्यामुळे निखालस आरोग्य संगीतासाठी शरीररुपी वाद्य दर्जेदार असावे, असा मंत्र सिनेअभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी दिला. देवगिरी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाले’मध्ये ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शरीराची उंची वाढविणे हा जीवनाचा अंतिम हेतू नसून जगण्याचा दर्जा वाढविणे म्हणजे आयुष्य असते. अशा दर्जेदार आयुष्यासाठी आपले आरोग्य सदृढ असणे महत्त्वाचे. आपले शरीर हे जर वाद्य असेल तर आरोग्य त्याचे संगीत आहे. त्यामुळे निखालस आरोग्य संगीतासाठी शरीररुपी वाद्य दर्जेदार असावे, असा मंत्र सिनेअभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी दिला. देवगिरी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाले’मध्ये ते बोलत होते.
महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागारे सभागृहात सोमवारी (दि.१२) पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे होते. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे आणि उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर उपस्थित होते.
‘दैनंदिन जीवनातील ताणतणाव : आरोग्य आणि कलाक्षेत्राचे योगदान’ या विषयावर बोलताना डॉ. आगाशे यांनी विद्यार्थ्यांना तणाव न घेता ज्ञानार्जनासाठी अभ्यास करण्याचा सल्ला दिला. ‘ज्याला शिकायचे तो चांगल्या शिक्षकाची वाट पाहत नाही. जीवनातील प्रत्येक अनुभव तो ज्ञान प्राप्त करतो. पदवी प्राप्त केली म्हणजे तुम्ही तज्ज्ञ होत नाहीत. खरी परीक्षा तर महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर खºया आयुष्यात उतरल्यावरच सुरू होते, असे ते म्हणाले.
कलेला शिक्षणात अनन्यसाधारण महत्त्व असून, त्यामुळे तणाव कमी होतो. कला व बुद्धी एकत्र नांदले तर आरोग्य उत्तम राहते, असे सूत्र डॉ. आगाशे यांनी मांडले. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेल्या निरागसतेबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ आणि ‘इंटेलेक्च्युअल मॅनिप्युलेशन’च्या काळात विद्यार्थ्यांचा भावनिक विकास होणे गरजेचे आहे. कलेतून भावनिक विकास शक्य होतो. तरुणांमध्ये वाढत असलेल्या नैराश्याच्या प्रमाणाविषयीदेखील त्यांनी भाष्य केले.
कुतूहल जागृत करणारी कला
वैद्यकीय महाविद्यालयातील गंमतीशीर स्वानुभव कथनातून त्यांनी विद्यार्थी जीवनात खेळ, कला, संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. ‘पाठ्यपुस्तकांऐवजी विद्यार्थी कथा-कादंबरी एका बैठकीत वाचून काढतो. कारण कला-साहित्यामध्ये वाचकांचे कुतूहल जागृत करण्याची क्षमता असते. विचारांना चालना देण्याची, कुतूहल निर्माण करण्याची क्षमता निरस-शुष्क पाठ्यपुस्तकांमध्येही हवी,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.