निलंगा नगरपरिषदेत ओशाळला इतिहास !

By Admin | Published: January 17, 2017 12:19 AM2017-01-17T00:19:56+5:302017-01-17T00:29:55+5:30

निलंगा/लातूर :महापुरुषांच्या नगरपरिषदेतील फोटोच्या पंक्तीत न.प. पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्यांच्या प्रतिमा नेऊन बसविल्या आहेत

Nilanga town council history! | निलंगा नगरपरिषदेत ओशाळला इतिहास !

निलंगा नगरपरिषदेत ओशाळला इतिहास !

googlenewsNext

निलंगा/लातूर : खादी ग्रामोद्योगच्या डायरीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रकाशित केल्याचा वाद देशभर गाजत असतानाच निलंगा नगरपरिषदेतही महापुरुषांच्या कर्तृत्वाचा इतिहास ओशाळल्याचे पुढे आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या नगरपरिषदेतील फोटोच्या पंक्तीत न.प. पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्यांच्या प्रतिमा नेऊन बसविल्या आहेत. नुस्त्या बसविल्याच नाहीत तर महापुरुषांच्या फोटोपेक्षा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्या तसबिरी आकर्षक आणि मोठ्या आहेत, हे विशेष.
इतिहासाच्या स्मृती डोळ्यासमोर याव्यात म्हणून महापुरुषांच्या तस्वीरी शासकीय कार्यालयांनी लावण्याच्या प्रथा आल्या. परंतु, या महापुरुषांची चरित्रे हल्लीच्या नेत्यांहून छोटी वाटू लागले आहेत. निलंगा नगरपरिषदेत याच गोष्टीचा प्रत्यय आला. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार उजेडात आणताना याची छायाचित्रेच सोशल मिडियावर व्हायरल केली. ज्यात निलंगा नगरपरिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या विविध दालनामध्ये लावलेल्या महापुरुषांच्या फोटोंच्या पंक्तीत शिवाजीराव निलंगेकर पाटील आणि संभाजीराव निलंगेकर पाटील, अशोकराव निलंगेकर पाटील अशा स्थानिक नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते.
विशेष म्हणजे या तीनही नेत्यांची छायाचित्रे ज्या महापुरुषांच्या फोटोशेजारी लावली होती, ते महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी अशा दिग्गजांची आहेत. आपल्या नेत्यांची आरती ओवाळणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणता स्तर गाठावा, याचे भानही राहिल्याचे दिसत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Nilanga town council history!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.