निलंगेकरांनीच अडविले नांदेडचे आयुक्तालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:53 AM2017-09-15T00:53:50+5:302017-09-15T00:53:50+5:30
त न्यूज नेटवर्क नांदेड : भाजपाचे मनपा प्रभारी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी युती संदर्भात आपल्याशी चर्चा केल्याचे बुधवारी झालेल्या मेळाव्यात सांगितले. मात्र प्रत्यक्षात निलंगेकर यांची माझ्यासोबत या विषयावर कसलीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा आ. हेमंत पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : भाजपाचे मनपा प्रभारी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी युती संदर्भात आपल्याशी चर्चा केल्याचे बुधवारी झालेल्या मेळाव्यात सांगितले. मात्र प्रत्यक्षात निलंगेकर यांची माझ्यासोबत या विषयावर कसलीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा आ. हेमंत पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. याचवेळी त्यांनी भाजपावर टिका करीत, नांदेड महसुल आयुक्यालयाचा प्रश्न न्यायालयात निकाली लागल्यानंतरही सदर कार्यालय लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनीच अडविल्याचा घणाघाती आरोपही केला.
बुधवारी नांदेडमध्ये भाजपाचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात कामगारमंत्री निलंगेकर यांनी युती संदर्भात शिवसेनेचे स्थानिक नेते आ. हेमंत पाटील यांची भेट घेतल्याचे जाहीरपणे तसेच पत्रकार परिषदेतही सांगितले होते. युती करण्यास भाजपा तयार असून या संदर्भात सेनेच्या वरिष्ठांशी आपण मुंबईमध्ये बोलू असे ते म्हणाले होते. याबाबत सेनेचे आ. पाटील म्हणाले की, निलंगेकर आणि आपली भेट झालीच नाही. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही. १२ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये मंत्रालयात लिफ्टमध्ये दोन मिनिटे आम्ही सोबत होतो. तेथेही हा विषय निघाला नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, भाजपाचा भर शिवसेनेची फोडाफोडी करण्यावर आहे. त्यानंतरही आम्ही हे विसरुन युतीसाठी इच्छुक आहोत. भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांच्याकडे सिडकोतील सेना कार्यकर्ते युती संदर्भात चर्चा करण्यासाठीही गेले होते, अशी माहिती त्यांनी दिली. महापालिका निवडणुकीत काँग्रेस हाच सेनेचा पहिल्या क्रमांकाचा शत्रु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपाच्या प्रचारात सामिल असल्याबाबत विचारले असता, पक्षाचा राजीनामा देवून त्यांनी कुठेही काम करावे. त्यांच्या या कृत्याची शिवसेना पक्षश्रेष्ठी दखल घेतील, असेही ते म्हणाले. नांदेडला महसूल आयुक्तालय व्हावे यासाठी शिवसेनेने वारंवार पाठपुरावा केला आहे. आंदोलनेही केले आहे. इतकेच नव्हे तर १ लाख नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्रही शासनाला पाठवले आहे. मात्र राजकीय विरोधातून हा विषय निलंगेकरांनी अडवला असल्याचा आरोप त्यांनी केला.
या निवडणुकीच्या तयारीसाठी सेना सज्ज झाली असून १५ सप्टेंबर रोजी संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. १ ते १० आॅक्टोबर या कालावधीत सेना नेते पर्यावरणमंत्री रामदास हे नांदेडत तळ ठोकून राहणार आहेत. या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख भुजंग पाटील, प्रकाश मारावार, पप्पु जाधव, धोंडु पाटील, अशोक उमरेकर, तुलजेश यादव आदींची उपस्थिती होती. बुधवारी झालेल्या मेळाव्यात सेनेचे उपजिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे यांचाही भाजपा प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले. मात्र आपण भाजपात प्रवेश केला नसून शिवसेनेतच निष्ठेने कार्यरत राहणार असल्याचे बडुरे यांनी सांगितले.