सिल्लोडमध्ये खवल्या मांजराची तस्करी करणारे नऊजण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:07 AM2021-03-04T04:07:17+5:302021-03-04T04:07:17+5:30
सिल्लोड : तालुक्यात दुर्मीळ असलेल्या खवल्या मांजराला पकडून तस्करी करणारे मुंबई, पैठण, औरंगाबाद, फरदापूर, तोंडापूर येथील ९ लोकांची ...
सिल्लोड : तालुक्यात दुर्मीळ असलेल्या खवल्या मांजराला पकडून तस्करी करणारे मुंबई, पैठण, औरंगाबाद, फरदापूर, तोंडापूर येथील ९ लोकांची टोळी सिल्लोड वनविभागाने सापळा रचून पकडली. त्यांच्यावर वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे यांनी दिली. सदर खवल्या मांजराला आरोपी ४ कोटी रुपयांत विकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गोपनीय माहितीवरून मुंबई येथील टोळी खवल्या मांजरांची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने सिल्लोडमधील एका हॉटेलजवळ सापळा लावला होता. यावेळी पथकाने एक कार (क्र. एमएच ०२, बीवाय ७३०७) थांबवून तपासणी केली. त्यात मुंबई येथील काही तस्कर सापडले. त्यांना खाक्या दाखवताच त्यांनी खवल्या मांजराची तस्करी करणार असल्याची माहिती दिली. यावरून वनअधिकाऱ्यांनी सिल्लोड तालुक्यातील अनाड गावातील गट क्रमांक १५५ या शेतात धाड टाकली. तेथे खवल्या मांजरासह तीन आरोपी व एक दुचाकी पथकाने जप्त केली. या प्रकरणी नऊजणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरोधात सिल्लोड वनविभागात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कार्यवाही उपवनसंरक्षक सूर्यकांत मकावार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक डी. आर. वाघचौरे, सिल्लोडचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे, स्ट्राइक फोर्सचे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद गायके, रोहन भाटे यांनी केली.
परराज्यात मागणी
सदर खवल्या मांजराचा जादूटोणा, धन काढणे व इतर अघोरी कामासाठी वापर केला जातो. यामुळे त्याला परराज्यात मोठी मागणी आहे. तसेच मांसासाठीही त्याची शिकार केली जाते. यामुळे मुंबई परिसरातील तस्कर खवल्या मांजर खरेदी करण्यासाठी अजिंठा परिसरातील अनाड येथे आले होते. या मांजराचा चार कोटी रुपयांत सौदा झाला असल्याचे आरोपींनी सांगितल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले.
मोठे रॅकेट उद्ध्वस्त
वन्यप्राण्यांची तस्करी करणारे मोठे रॅकेट वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त केले आहे. आरोपींना गुरुवारी सिल्लोड न्यायालयात हजर करण्यात येणार असून, खवल्या मांजराची तस्करी कशासाठी करण्यात येणार होती. त्याची विक्री कोठे करणार होती, मुख्य सूत्रधार कोण, या दिशेने वनविभाग तपास करीत आहे.
- संजय भिसे, वनपरिक्षेत्र, अधिकारी सिल्लोड.
फोटो- कॅप्शन
- खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या आरोपींसह वनविभागाचे अधिकारी.
चौकट
हे आहेत आरोपी
खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या आरोपींत सुनील रतन दांडगे (रा. अजिंठा), शेख वसीम शेख अहेमद (रा. फरदापूर), कैलास भिका जिरी (रा. तोंडापूर), रतन भावराव साळवे (रा. औरंगाबाद), अनिल रामराव थोरात (रा. आगर मांदुर, ता. पैठण), मोहन लक्ष्मण अधिकारी (रा. मालाड पूर्व, ता. मानगाव), संतोष सुरेश कोडसकर (रा. राजेशनगर, ता. बोरिवली ईस्ट, मुंबई), गंगाराम लक्ष्मण पंघरी (रा. बोरिवली मुंबई), संदीप उत्तम शिर्के (रा. चारकोप सेक्टर, कांदिवली, मुंबई) यांचा समावेश आहे.