मार्च एण्डिंग नऊ दिवसांवर; विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 05:59 PM2021-03-24T17:59:32+5:302021-03-24T18:00:04+5:30

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढावे म्हणून विद्यार्थ्यांना भारत सरकारतर्फे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते.

On the nine days ending March; When will students receive scholarships? | मार्च एण्डिंग नऊ दिवसांवर; विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार

मार्च एण्डिंग नऊ दिवसांवर; विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार

googlenewsNext
ठळक मुद्दे२४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित

औरंगाबाद : आर्थिक वर्ष मावळण्यास आता अवघे ८ दिवस उरले आहेत, तरीही अजून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यात २४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयातच पडून आहेत. यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढावे म्हणून विद्यार्थ्यांना भारत सरकारतर्फे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्रीशिपचा लाभ दिला जातो. पूर्वी ऑफलाइन पद्धतीने कॉलेजमधून अर्ज भरून घेतले जायचे. मात्र, सन २०१०-११ या शैक्षणिक वर्षापासून ही योजना संगणकीकृत करण्यात आली. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी ऑनलाइन अर्ज करावा लागत होता. परंतु, मागील शैक्षणिक वर्षापासून अर्ज अपडेट करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांऐवजी कॉलेजवर टाकण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फक्त प्रथम वर्षीच ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे, तर द्वितीय, तृतीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज कॉलेजच्या वतीने अपडेट करण्यात येतात. जिल्ह्यात १९५ महाविद्यालये व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दरवर्षी या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.

सन २०२०-२१ या वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे समाजकल्याण विभागाकडे २८ हजार २२० अर्ज प्राप्त झाले असून, महाविद्यालयांकडे अजूनही ११ हजार ३६४ विद्यार्थ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे अडकलेले आहेत. याशिवाय, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे विभागाला प्राप्त ३४ हजार १२० अर्जांपैकी ७ हजार ४९६ अर्ज मान्य केले असून, ४७२६ अर्ज रद्द केले आहेत. या प्रवर्गातील १४ हजार २०६ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाकडे प्रलंबित आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज प्राप्त झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा केलेली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल- मे मध्ये त्यांना या शिष्यवृत्तीची रक्कम मिळेल, असे समाजकल्याण अधिकारी जावेद खान यांनी सांगितले.

अर्ज सादर करण्याची २५ मार्चपर्यंत ‘डेडलाइन’
शिष्यवृत्ती विभागाचे समाजकल्याण अधिकारी जावेद खान यांनी सांगितले की, मार्च एण्ड जवळ आला, तर अजून सन २०२०-२१ या वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झालेले नाहीत. यासंदर्भात आपण अनेकदा महाविद्यालयांना स्मरण करून दिले. या आठवड्यात आपण स्वत: विद्यापीठासह मोठ्या महाविद्यालयांना भेटी दिल्या. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना २५ मार्चपर्यंत समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करण्याची ‘डेडलाइन’ दिली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले; परंतु हार्ड कॉपी न दिल्यामुळे अर्ज अडकून पडल्याचे कारण महाविद्यालयांनी सांगितले आहे.
 

Web Title: On the nine days ending March; When will students receive scholarships?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.