शहरात आणखी नऊ उड्डाणपूल

By Admin | Published: July 17, 2016 12:25 AM2016-07-17T00:25:48+5:302016-07-17T00:35:02+5:30

औरंगाबाद : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या जालना रस्त्यावर चार नवीन उड्डाणपूल आणि तीन भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत.

Nine flyovers in the city | शहरात आणखी नऊ उड्डाणपूल

शहरात आणखी नऊ उड्डाणपूल

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या जालना रस्त्यावर चार नवीन उड्डाणपूल आणि तीन भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत. याबरोबरच बीड बायपास रस्त्यावरही तीन उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. जालना रोड आणि बीड बायपास यांना दोन उड्डाणपुलांनी जोडले जाणार आहे. पावसाळ्यानंतर ही कामे सुरू होऊन दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे ७५० कोटी रुपये खर्च करून केल्या जाणाऱ्या या कामांचे मराठवाडा विकास मंडळात शुक्रवारी झालेल्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. खा. चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी निधी पांडे, महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यू. जे. चामरगोरे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अलोक वार्ष्णेय यांच्यासह रेल्वे, एसटी, लष्कर, महावितरण, बीएसएनएल, एमआयडीसी, सिडको या यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
७५० कोटी रुपयांचा निधी मंजूर
जालना रोड आणि बीड बायपास रस्त्यावर उड्डाणपूल, भुयारी मार्ग यांची कामे करण्यासाठी केंद्र सरकारने ७५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
चालू महिन्याच्या अखेरीस निविदा प्रक्रियेची कागदपत्रे मान्यतेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर केली जातील.
आॅगस्ट महिन्यात या कामांच्या निविदा काढल्या जातील. पावसाळा संपल्यानंतर दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
कंत्राटदार असणार ‘ग्लोबल’
या कामांसाठी जागतिक स्तरावर निविदा मागविल्या जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निधीचा तुटवडा नसतो. कामाच्या प्रगतीनुसार कंत्राटदारांस दरमहा ठराविक रक्कम अदा केली जाते. त्यामुळे जागतिक पातळीवरील कंत्राटदारांचीच या कामांसाठी निवड केली जाणार आहे.
असा जोडणार जालना रोड आणि बायपास
४वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी जालना रोड आणि बीड बायपास जोडला जाणार आहे. सिडकोतील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून ते थेट बीड बायपासपर्यंत शहरातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधला जाईल. शिवाजीनगर ते बीड बायपास असा आणखी एक उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. हा उड्डाणपूल शिवाजीनगरातून सुरू होऊन देवळाई चौकाच्या पुढे संपणार आहे.
बायपासचे ‘ग्रहण’ सुटणार
४बीड बायपास रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी आणि वाढत्या अपघातांचे ग्रहण सोडण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. त्यानुसार संग्रामनगरचा उड्डाणपूल संपताच नवा उड्डाणपूल बांधला जाणार आहे. ‘एमआयटी’ महाविद्यालयासमोर दुसरा आणि झाल्टा फाट्यावर तिसरा उड्डाणपूल बांधला जाईल.
आधी सर्व्हिस रोड
जालना रस्त्यावरील उड्डाणपुलांची कामे हाती घेण्यापूर्वी सर्व्हिस रोडची कामे पूर्ण केली जातील. ही कामेदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार असल्याची माहिती चामरगोरे यांनी दिली.
४जालना रोडच्या रुंदीकरणासाठी चार मालमत्ता संपादित कराव्या लागतील. मालमत्ताधारकांना ‘टीडीआर’ देऊन आठवडाभरात रुंदीकरणासाठी मार्किंगचे काम हाती घेतले जाईल, असे आयुक्त बकोरिया यांनी सांगितले.

Web Title: Nine flyovers in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.