राष्ट्रवादीच्या ९ जि़प़ सदस्यांचे राजीनामे

By Admin | Published: September 28, 2014 11:33 PM2014-09-28T23:33:44+5:302014-09-28T23:51:50+5:30

नांदेड : जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या नऊ सदस्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत़

Nine members of NCP's resignation | राष्ट्रवादीच्या ९ जि़प़ सदस्यांचे राजीनामे

राष्ट्रवादीच्या ९ जि़प़ सदस्यांचे राजीनामे

googlenewsNext

नांदेड : जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या नऊ सदस्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत़ जि़प़ च्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीत आपले म्हणणे ऐकून न घेता काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठीची नावे जाहीर केल्याचा आरोप या नऊ सदस्यांनी केला आहे़
जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहनराव पाटील टाकळीकर, मारोतराव कवळे, पांडुरंग गायकवाड, रमेश सरोदे, डॉ़ मीनाक्षी कागडे, सुरेखा कदम, नंदाताई पवार, कमलबाई पाटील आणि ललिता चिंतलवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपले राजीनामे दिले आहेत़ याबाबत जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकरांनाही कळविण्यात आले आहे़ उपरोक्त सदस्यांनी वेळोवेळी दुटप्पीपणाची वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे़ २१ सप्टेंबर रोजीच्या जि़ प़ अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही उमेदवार निवडीत म्हणणे ऐकून घेतले नाही़ आघाडी धर्माप्रमाणे गत अडीच वर्षांत सर्वांना समान पदे व सन्मान मिळाला पाहिजे, अशी भूमिका असल्याचे सांगत जि़प़ सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचे राजीनामे देत असल्याचे या नऊ सदस्यांनी पत्रात नमूद केले आहे़
दरम्यान, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही या गटाने पत्र देत राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत ब गट म्हणून सभागृहात बसण्याची परवानगी या नऊ सदस्यांनी केली होती़ या नऊ सदस्यांनी जि़प़ अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांना मदत केली असली तरी पक्षावरील नाराजी मात्र त्यांनी व्यक्त केली आहे़ जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकरांनाही या निवडणुकीत विचारात घेतले नसल्याने त्यांनीही संताप व्यक्त केला़
जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांना पक्षाच्या नऊ सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत विचारले असता पक्षातील वरिष्ठांनीच या पदासाठी आपले नाव सूचविले असल्याचे सांगितले़ पक्ष निरीक्षक दांडेगावकर यांनी सर्व सदस्यांची मते विचारात घेतली होती़ २० सप्टेंबर रोजी बैठकही झाली होती़ त्यांची नाराजी दूर करणार का, या प्रश्नावर उत्तर देताना उपाध्यक्ष धोंडगे यांनी हा पक्ष पातळीवरील विषय असून आपण त्यावर काही बोलू शकत नसल्याचे सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Nine members of NCP's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.