नऊ हजार विद्यार्थ्यांनी दिली विद्यापीठाची 'पेट' परीक्षा; ८० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 01:06 PM2024-10-04T13:06:20+5:302024-10-04T13:07:26+5:30
एकूण ४४ विषयांसाठी ही चाचणी घेण्यात आली आहे
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पीएच.डी. प्रवेशासाठीची चाचणी परीक्षा (पेट) चारही जिल्ह्यांतील ११ केंद्रांवर सुरळीतपणे पार पडली. या परीक्षेला एकूण ११ हजार ४७६ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ९ हजार १६६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. एकूण नोंदणीच्या ८० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी दिली.
विद्यापीठाने पेट परीक्षेचे आयोजन केल्यापासून हा चर्चेचा विषय बनला होता. सुरुवातील उपलब्ध मार्गदर्शक, संशोधन केंद्रांवरून जोरदार खडाजंगी झाली होती. त्यामध्ये तोडगा निघाल्यानंतर अर्ज भरण्यात आले. त्यानंतरही पात्र-अपात्रेवरून प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पोहोचले होते. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी काही गोंधळ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यातच परीक्षेच्या पूर्वसंध्येपर्यंत हॉलतिकीट देण्यात येत होती. तसेच हॉलतिकिटावर २ ऑक्टोबरची सुटी असल्यामुळे अनेकांना साक्षांकित करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे परीक्षा केंद्रांवरच हॉलतिकीट सांक्षाकित करून देण्यासाठीची यंत्रणा उभारण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी धावपळ करावी लागली नाही.
प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी शहरातील चार केंद्रांना भेटी देत पर्यवेक्षक, निरीक्षकांना सूचना दिल्या. चार जिल्ह्यांतील एकूण २२ प्राध्यापकांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी व युनिकचे संचालक डॉ. प्रवीण यन्नावार यांनी तांत्रिक अडचणी येऊ नये म्हणून पूर्णवेळ लक्ष ठेवून होते. एकूण ४४ विषयांसाठी ही चाचणी घेण्यात आली. त्यात ४९७ मार्गदर्शकांकडे एक हजार ५७६ जागा रिक्त आहेत. प्रवेशपूर्व प्रक्रिया ’ऑनलाइन’ पद्धतीने राबविल्यानंतर परीक्षा ऑफलाइन घेण्यात आली.
चार सत्रात झाली परीक्षा
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील ११ केंद्रांवर चार सत्रात ही परीक्षा घेण्यात आली. सकाळच्या सत्रात १० वाजता, १२ वाजता, तर दुपारच्या सत्रात ३ वाजता, ५ वाजता ही चाचणी घेण्यात आली. प्रत्येक पेपरला ५० प्रश्नांसाठी १०० गुण देण्यात आले हाेते.