प्रवेशासाठी नऊ प्रकारचे पासेस; मंत्र्यांना निवेदन देताना शिष्टमंडळात ५ जणांनाच परवानगी
By सुमित डोळे | Published: September 16, 2023 12:07 PM2023-09-16T12:07:37+5:302023-09-16T12:08:30+5:30
छत्रपती संभाजीनगरातील पाच प्रमुख मार्ग बंद राहणार
छत्रपती संभाजीनगर : मंत्रिमंडळासह सर्व उच्च पदस्थ अधिकारी शनिवारी शहरात आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. मोर्चांना केवळ क्रांती चौक ते भडकल गेट या मार्गावरच परवानगी देण्यात आली आहे. मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी तेथून पाच जणांच्याच शिष्टमंडळांना परवानगी असेल. पोलिस त्यांच्या वाहनातून त्या पाच जणांना औरंगाबाद क्लबमध्ये नेऊन भेट घडवतील. मंत्र्यांवर शाईफेक व अन्य गैरप्रकार राेखण्यासाठी पोलिसांनी कसून तयारी केली असून कडेकोट तपासणीचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. यात नऊ रंगांचे पासेस ठरवण्यात आले असून त्याशिवाय कोणालाही प्रवेश नसेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
हे प्रमुख पाच मार्ग बंद
- सकाळी सात ते दहा शहानूरमियाँ दर्गा चौक ते सूतगिरणी चौक.
- सकाळी सात ते सायंकाळी पाच भडकल गेट ते अण्णा भाऊ साठे चौक.
- सकाळी नऊ ते सायंकाळी पाचदरम्यान क्रांती चौक, अजबनगर, बंडू वैद्य चौक, सावरकर चौक, निराला बाजार, नागेश्वरवाडी, खडकेश्वर टी पॉइंट, सांस्कृतिक मंडळ, ज्युबिली पार्क, भडकल गेटपर्यंत.
- सायंकाळी चार ते रात्री आठपर्यंत वोक्हार्ट टी ते लहुजी साळवे चौकमार्गे जय भवानी चौकापर्यंत, लहुजी साळवे चौक ते कलाग्राममार्गे (ब्लू वेल सोसायटी चौक) व कलाग्राम ते आयुष पेपर मिलपर्यंत.
- क्रांती चौकात शनिवारी सकाळी नऊ ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत गोपाल टी ते सिल्लेखाना व क्रांती चौक उड्डाणपुलाची पूर्व बाजू आणि क्रांती चौक उड्डाणपुलाच्या पश्चिम बाजूचा सर्व्हिस रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे.
पार्किंग व्यवस्था
- मंत्रिमंडळ बैठकीसाठी येणारे मोर्चेकरी व निवेदनकर्त्यांच्या वाहनांची कर्णपुरा मैदानावर पार्किंग व्यवस्था असेल.
- चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्रामसमोरील रिद्धी सिद्धी लॉन्सवरील कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी
- गरवारे मैदानाजवळील पार्किंग
असा असेल बंदोबस्त
सहा पोलिस अधीक्षक, २३ सहायक आयुक्त, उपअधीक्षक, ११५ पोलिस निरीक्षक, २९६ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, १,७०० पुरुष अंमलदार, १४७ महिला अंमलदार, चार एसआरपीएफ कंपन्या, ५०० होमगार्ड.