जिल्ह्यात ग्रामीण भागातील नववी ते
By | Published: November 22, 2020 09:01 AM2020-11-22T09:01:14+5:302020-11-22T09:01:14+5:30
\Sजिल्हाधिकारी सुनील चव्हाण : जिल्हा प्रशासनाचा निर्णय, शाळाच शिक्षणाचे उत्तम माध्यम -- औरंगाबाद : खेड्यात ऑनलाईन माध्यमे, साहित्याची उणीव ...
\Sजिल्हाधिकारी सुनील चव्हाण : जिल्हा प्रशासनाचा निर्णय, शाळाच शिक्षणाचे उत्तम माध्यम
--
औरंगाबाद : खेड्यात ऑनलाईन माध्यमे, साहित्याची उणीव जाणवते. नेटवर्कच्याही समस्या असून, शाळाच ग्रामीण भागात शिक्षणाचे उत्तम माध्यम आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना जिल्ह्यात एकही कंटेन्मेंट झोन नाही. चांगल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे रुग्ण बरे होण्याचा दर अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ८२४ शाळांत नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेत उपरोक्त निर्णय जाहीर केला. यावेळी मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद सीईओ मंगेश गोंदावले, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जायस्वाल, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, स्थानिक प्रशासनावर शाळा सुरू करण्याची जबाबदारी शासनाने सोपविली होती. त्यास अनुसरून जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी, काळजी घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरी आणि ग्रामीण परिस्थिती व तेथील समस्या वेगळ्या आहेत. ग्रामीणमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या घटत असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्के आहे. शहरापेक्षा मृत्यूदरही कमी आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या साधनांची कमतरता आणि नेटवर्कच्या समस्येमुळे शिक्षणाची घडी बसवण्यासाठी शाळा सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी ७१३० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केली जात आहे. शनिवारी दुपारपर्यंत साडेचार हजार शिक्षकांची तपासणी झालेली असून, त्यातून ९ जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. हे प्रमाण चिंता करण्यासारखे नाही. सोमवारपर्यंत सर्व तपासण्या पूर्ण होतील. शिक्षकांना आरटीपीसीआर तपासणीशिवाय शाळेत जाता येणार नाही, तर पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत घेतले जाईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. ग्रामीणमध्ये तपासणी झालेल्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती, तर शहरात ५० टक्के शिक्षकांची सोमवारपासून उपस्थिती असेल, असे शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण म्हणाले.
---
शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे, पण जीवन अमूल्य
---
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे आहे. मात्र, त्यांचे जीवन अमूल्य आहे. बाधितांच्या संख्येतील वृद्धी आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता याची पडताळणी १० डिसेंबरला करू. शाळा सोमवारपासून सुरू होतील; पण विद्यार्थ्यांना ३ जानेवारीपर्यंत शाळेत न येण्याचे सांगण्यात आल्याचे मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.
---
जिल्हाधिकारी व आयुक्तांमध्ये समन्वयाचा अभाव
---
मनपा आयुक्तांनी शनिवारी आधी शाळेबाबतची मनपाची भूमिका जाहीर केली. त्यानंतर तातडीची पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय जाहीर करताना सीईओ सोबत होते, तर मनपा आयुक्त पत्रकार परिषद सुरू होण्याच्या काही क्षणापूर्वी तिथे पोहोचले. सर्व काही आलबेल असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी भासवले. मात्र, शहरी व ग्रामीणवरून अधिकाऱ्यांतील समन्वयाचा अभाव यातून दिसून आला.