निपट निरंजन महाराजांची यात्रा यंदा रद्द; यावर्षीपासून ११ खेळाडूंना घेणार दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 05:49 PM2020-12-30T17:49:36+5:302020-12-30T17:55:05+5:30
Nipat Niranhan Yatra महाराष्ट्रातील नाथ संप्रदायात निपट निरंजन महाराजांचे नाव प्रसिद्ध आहे.
औरंगाबाद : शहरातील हनुमान टेकडी परिसरातील सद्गुरू श्री निपट निरंजन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी भरणाऱ्या यात्रेची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित होत आहे. मात्र, समाधी मंदिरात श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच यावर्षीपासून गुणवंत खेळाडूंना दत्तक घेण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संयोजन समितीने दिली आहे.
महाराष्ट्रातील नाथ संप्रदायात निपट निरंजन महाराजांचे नाव प्रसिद्ध आहे. बुंदेलखंडातून बुऱ्हाणपूरमार्गे औरंगाबादेत येऊन स्थायिक झालेल्या निपट निरंजन महाराजांना दौलताबादेत संत जनार्दन स्वामी यांनी बोलावलेल्या संत संमेलनात चर्पटनाथांचा अनुग्रह मिळाला. तेव्हापासून त्यांनी हनुमान टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमात साधना केली. मुघल बादशाह औरंगजेबाने औरंगाबादेत मुक्कामी असताना निपट निरंजन महाराजांची भेट घेतली होती. त्यांच्यातील संवाद ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांनी समाधी घेतली. या ठिकाणी मार्गशीर्ष वद्य एकादशीला यात्रा भरते. पेरू, बोरे आणि रेवड्यांचा प्रसाद असलेल्या या यात्रेनिमित्त द्वादशीच्या सूर्योदयाला खिचडीचा प्रसाद तयार केला जातो. यावर्षी यात्रा भरणार नसली तरी, या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या भागवत कथा ज्ञानयज्ञाचे हे ११ वे वर्ष आहे. लव्हाळी येथील व्यासपूर आश्रमाचे स्वामी रामेश्वरानंद सरस्वती कथा निरूपण करतील. पहाटे काकडआरती, सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कथा निरूपण होईल. शुक्रवारी (दि. ८ ) संदेश वाघ, विलास संभाहरे आणि कचरू शेळके यांच्या वतीने आयोजित महाप्रसादाने कथेची सांगता होईल. या काळात भाविकांनी कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळत गर्दी करू नये, असे आवाहन न्यासाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, दयाराम बसैये, सचिव विनायक पांडे, प्रेमराज डोंगरे, संदेश वाघ, संतोष गुजराथी, प्रा. डॉ. फुलचंद सलामपुरे, सुरेश पवार, सुरेश बाजपेई, विलास संभाहरे, सचिन खैरे, कचरू शेळके, ज्ञानेश्वर कोकणे, जगदीश चौधरी, शरद कुलकर्णी, माधव गिरी आदींनी केले आहे.
यावर्षीपासून न्यासाचा नवा उपक्रम
विविध क्रीडा प्रकारांमध्ये कौशल्य आजमावणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील ११ खेळाडूंना यावर्षीपासून देवस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षी दत्तक घेतले जाणार आहे. यामध्ये कृष्णा मिसाळ, ऋषिकेश बिरोटे, कुणाल जांंगडे, आदित्य भिकने हे चार क्रिकेटपटू, प्रवीण दसपुते, सौरभ राऊत, कैफ अली खान हे तीन कुस्तीपटू, अनिल घुंगरसे, विराज शाम शुक्ला हे दोन अथलेटिक्स खेळाडू आणि रोहित परदेशी व जय तिवारी या बास्केटबॉलपटूंंचा समावेश आहे. या खेळाडूंच्या क्रीडा साहित्य आणि खुराक याची व्यवस्था वर्षभर न्यासातर्फे केली जाणार आहे. या उपक्रमाला ज्ञानेश्वर जाधव, विनायक पांडे, राजेश वाघ, डॉ. रत्नदीप देशमुख, संदेश वाघ, माजी नगरसेवक सचिन खैरे, प्रदीप सोहोनी, केदार थत्ते, राजेंद्र चव्हाण, ऍड. आशुतोष डंख, आकाश मेडिकल यांचे सहकार्य लाभत आहे, अशी माहिती न्यासाचे सचिव विनायक पांडे यांनी दिली.
कुस्त्यांचा फड रंगणार नाही
संपूर्ण मराठवाड्यात यात्रेतील कुस्त्यांचा फड हे प्रमुख आकर्षण आहे. गावोगावचे मल्ल या यात्रेत येऊन आपली ताकद आजमावतात. परंतु, यंदा यात्रा रद्द झाल्यामुळे हा आखाडा सुना राहणार आहे, अशी माहिती संयोजन समितीने दिली आहे.
पुरातन भिंतीचे संवर्धन करण्याची मागणी
मोगल बादशहा औरंगजेबाचे गर्वहरण करण्यासाठी निपट निरंजन महाराजांनी भिंत चालवल्याची कथा त्यांच्या चरित्रात आली आहे. समाधी मंदिरासमोर शासकीय विज्ञान संस्थेच्या वसतिगृहाच्या आवारात असलेल्या या भिंतीचे आणि महाराजांच्या ध्यानगुंफेचे संवर्धन करावे, या मागणीचे निवेदन न्यासातर्फे पालकमंत्री सुभाष देसाई यांना देण्यात येणार आहे.