छत्रपती संभाजीनगरातील अखंड उड्डाणपूल, औट्रम घाट बोगद्याबाबतही नितीन गडकरी सकारात्मक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 12:14 PM2024-09-28T12:14:26+5:302024-09-28T12:15:17+5:30
जालना रोड ‘एनएचएआय’कडे हस्तांतरित होताच शेंद्रा ते वाळूज अखंड उड्डाणपूलाचे काम सुरू करण्यासाठी सकारात्मक
- विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर : शहरात शेंद्रा ते चिकलठाणा डबलडेकर उड्डाणपुलासाठी जालना रोड भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कडे हस्तांतरित होणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर अखंड पुलासाठी निधी देण्याबाबत सकारात्मकरीत्या विचार केला जाईल. कन्नड येथील औट्रम घाटात बोगदा बांधण्याबाबत शुक्रवारी नियोजनात्मक चर्चा केल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या नागरी सत्कारासाठी गडकरी शहरात आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत संवाद साधला. बागडे यांच्या निवासस्थानी गडकरी यांनी ‘एनएचएआय’चे प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले व इतर अधिकाऱ्यांकडून मंत्री गडकरी यांनी ‘एनएचएआय’च्या प्रकल्पांसह औट्रम घाट व इतर कामांचा आढावा घेतला.
जालना रोड हस्तांतरित होताच गती
शेंद्रा ते चिकलठाणा व पुढे वाळूजपर्यंत डबलडेकर उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेची घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी २४ एप्रिल २०२२ केली होती. यासाठी महापालिका स्मार्ट सिटीने विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) देखील तयार केला होता. शेंद्रा एमआयडीसी ते वाळूजपर्यंत डबलडेकर उड्डाणपूल म्हणजे खाली रस्ता, वर पूल व मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे. हा प्रकल्प २५ कि.मी. लांबीचा असणार आहे. यामध्ये १६ कि.मी. चौपदरी उड्डाणपूल आणि ९ कि.मी.चा डबलडेकर पूल असणार आहे. हा संयुक्त प्रकल्प सुमारे ६ ते ७ हजार कोटी रुपयांचा असून जालना रोड ‘एनएचएआय’कडे हस्तांतरित झाल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळेल, असे गडकरी म्हणाले.
औट्रम घाटाची सद्य:स्थिती
औट्रम घाट सध्या जड वाहतुकीसाठी बंद आहे. गेल्या पंधरवड्यात ‘एनएचएआय’ने न्यायालयात बोगद्याच्या कामाबाबत बाजू मांडली. ‘युपीए’ सरकारच्या काळात सोलापूर-धुळे महामार्गाचे काम सुरू झाले. त्यात ३ हजार कोटींच्या औट्रम बोगद्याचा समावेश होता. सध्या सात हजार कोटींवर बोगद्याचे काम गेले. जड वाहतुकीसाठी मार्ग बंद असून पर्यायी मार्गासाठी वर्षभरापासून शोध सुरू आहे. सध्या औट्रम घाट जड वाहतुकीसाठी बंद आहे.