गडकरींच्या व्हिजनला सुरुंग; औरंगाबाद ते पैठण रस्ता चौपदरीऐवजी द्विपदरी करण्याचा घाट ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 07:43 PM2022-06-02T19:43:07+5:302022-06-02T19:44:57+5:30

एनएचएआयच्या या प्रकाराविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुढच्या आठवड्यात भेटून सगळा प्रकार कानावर घालणार असल्याचे रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांनी सांगितले.

Nitin Gadkari's vision undermined; Plan to make Aurangabad to Paithan road two-lane instead of four-lane? | गडकरींच्या व्हिजनला सुरुंग; औरंगाबाद ते पैठण रस्ता चौपदरीऐवजी द्विपदरी करण्याचा घाट ?

गडकरींच्या व्हिजनला सुरुंग; औरंगाबाद ते पैठण रस्ता चौपदरीऐवजी द्विपदरी करण्याचा घाट ?

googlenewsNext

- विकास राऊत
औरंगाबाद :
औरंगाबाद ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे औरंगाबाद ते पैठण हा रस्ता चौपदरीऐवजी द्विपदरी करण्यासाठी एनएचएआयमधील काही महाभागांनी नागपूर क्षेत्रीय कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्याची माहिती पुढे आली आहे.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी २४ एप्रिल २०२२ रोजी पुढच्या दौऱ्यात औरंगाबाद ते पुणे या द्रुतगती मार्गाचे भूमीपूजन करण्याचा शब्द देत औरंगाबाद ते पैठण या सुमारे १६०० कोटी रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन केले. त्यांच्या व्हिजनला एनएचएआयमधील काही महाभागांनी सुरुंग लावत नागपूर कार्यालयाशी पत्रव्यवहार करून औरंगाबाद ते पैठण हा महामार्ग १० मीटर दोन्ही बाजूंनी रुंद करावा. जेणेकरून भूसंपादनाचा खर्च वाचेल. तसेच नवीन प्रस्तावित महामार्गाशी औरंगाबाद ते पैठण रस्ता जोडल्यास बहुतांश मार्ग चौपदरी होईल. भूसंपादन, अलायन्मेंटवरून सुरू असलेले वाददेखील होणार नाहीत. अशा आशयाचे पत्र एनएचएआयच्या प्रकल्प कार्यालयाकडून नागपूर कार्यालयाकडे पाठविल्याची चर्चा असून, एनएचएआयच्या अध्यक्षा अलका उपाध्याय यांच्याकडे याबाबत येत्या आठवड्यांत बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.

अलायन्मेंट बदलण्याचे अधिकार प्रकल्प संचालक कार्यालयाला नाहीत. यातूनच महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्तावच बदलण्याची भूमिका काही अधिकाऱ्यांनी घेतली असून, तसे क्षेत्रीय व मुख्य कार्यालयापर्यंत पत्राद्वारे कळविण्यात आल्याची चर्चा आहे. कुणाच्या फायद्यासाठी तो महामार्ग नसून औरंगाबाद ते पैठण या पट्ट्यातील उद्योग आणि भक्तांना नाथनगरीपर्यंतचा प्रवास सुकर होण्यासाठी १२ वर्षांनंतर भूमिपूजनाला मुहूर्त लागला. चार वेळा निविदा, दोन डीपीआर होऊनही त्या मार्गातील अडथळे अजून कायम आहेत. सुमारे १०० हेक्टर भूसंपादन, आक्षेप, हरकतींचा निपटारा झाल्यावर निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल. याला सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्टपणे दिसत असतानाच आता तो रस्ता १० मीटर म्हणजेच विद्यमान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ५-५ मीटर रुंदीकरणाचा घाट घालण्यासाठी एनएचएआयमधील काही अधिकारी सरसावले आहेत. जर या अधिकाऱ्यांचे मनसुबे यशस्वी झाले तर औरंगाबाद ते पैठण मार्ग चौपदरी होणार नाही.

प्रकल्प संचालकांची माहिती अशी----
प्रकल्प संचालक अरविंद काळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, १० मीटरमध्येच पैठण रस्ता रूंदीकरण करण्याच्या काही हालचाली सुरू नाहीत. भूसंपादनाच्या अनुषंगाने काही हरकती आल्या आहेत. भूसंपादनामुळे काही वाद होण्याची शक्यता असल्यामुळे द्विपदरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याबाबत पत्रव्यवहार झाला आहे काय ? याबाबत अधिकृतपणे काही सांगता येणार नाही. जोपर्यंत मुख्यालयाकडून याबाबत काही सूचना येणार नाहीत, तोवर काही सांगता येणार नाही.

कार्यकारी अभियंता काय म्हणतात----
कार्यकारी अभियंता महेश पाटील यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, मी सुटीवर होतो. असे काही पत्र येथून नागपूर कार्यालयाला गेले आहे की नाही, याची माहिती घेऊनच बोलता येईल. औरंगाबाद ते पुणे या प्रस्तावित रस्त्याच्या घोषणेमुळे औरंगाबाद ते पैठण हा रस्ता १० मीटर रूंद करण्याबाबत पत्र आपल्या स्तरावरून गेले आहे काय? याबाबत पाटील यांनी माहिती घ्यावी लागेल, असे उत्तर दिले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री काय म्हणाले----
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद ते पुणे या द्रुतगती मार्गाची घोषणा करताना औरंगाबाद ते पैठण या महामार्गाचे भूमिपूजन केले आहे. पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गाचे अलायन्मेट वेगळे आहे. त्याचा पैठणशी काहीही संबंध नाही. औरंगाबाद ते पैठण हा रस्ता चौपदरीच होईल, यासाठी मी स्वत: गडकरी यांना दोन दिवसांत भेटेन.

गडकरींना भेटून त्यांच्या कानावर घालणार----
औरंगाबाद ते पैठण महामार्ग द्विपदरी करणाच्या हालचाली सुरू झाल्याचे माझ्या कानावर आले आहे. जर का रस्ता द्विपदरी करायचा असेल, तर मग आहे तोच रस्ता चांगला आहे. एनएचएआयच्या या प्रकाराविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुढच्या आठवड्यात भेटून सगळा प्रकार कानावर घालणार असल्याचे रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांनी सांगितले.

Web Title: Nitin Gadkari's vision undermined; Plan to make Aurangabad to Paithan road two-lane instead of four-lane?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.