नितीन पाटील यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा एकाच ओळीत राजीनामा  

By स. सो. खंडाळकर | Published: August 1, 2023 07:31 PM2023-08-01T19:31:56+5:302023-08-01T19:33:02+5:30

अविश्वास प्रस्ताव दाखल होताच नितीन पाटील यांनी राजीनामा देऊन टाकला.

Nitin Patil resigns from the post of District Bank President of Chhatrapati Sambhajinagar | नितीन पाटील यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा एकाच ओळीत राजीनामा  

नितीन पाटील यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा एकाच ओळीत राजीनामा  

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : नितीन पाटील यांनी मंगळवारी दुपारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सोमवारी त्यांच्यावर वीसपैकी अठरा सदस्यांनी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजय मोटे यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता आणि लगेच पाटील यांनी राजीनामा देऊन टाकला.

हा राजीनामा फक्त एका ओळीचा आहे. व्यवस्थापकीय संचालक व बँकेचे उपाध्यक्ष यांच्या नावाने हे राजीनामा पत्र लिहिलेले आहे. ‘आज दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. छत्रपती संभाजीनगर बँकेच्या चेअरमन/ अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे’ एवढे एक वाक्य लिहून नितीन पाटील यांनी सही केली आहे.

बँकेची निवडणूक भर कोरोनात २०२० साली झाली होती. दोन वर्षे पाच महिने नितीन पाटील हे या पदावर राहिले. काँग्रेस, भाजप व आता शिवसेना शिंदे गट असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. सुरेशदादा पाटील यांच्या निधनानंतर नितीन हेच दोन वर्षे अध्यक्ष राहिले. बँकेचे संचालक असलेले राज्याचे अल्पसंख्याक व पणनमंत्री अब्दुल सत्तार यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी त्यांची प्रतिमा बनली होती. परंतु, आता हा अविश्वास प्रस्ताव आणण्यात अब्दुल सत्तार यांचाच पुढाकार राहिला. इतके त्यांचे संबंध ताणले गेले होते, असे मानले जात आहे.

इच्छुकांची संख्या वाढतेय
नितीन पाटील यांचा राजीनामा झाल्यानंतर या पदासाठी भाजपतर्फे जावेद पटेल, सुहास शिरसाट, अभिषेक जैस्वाल, शिंदे गटातर्फे कृष्णा पाटील डोणगावकर आणि मनोज राठोड हे तीव्र इच्छुक असल्याचे मानले जात आहे. शिंदे गटाच्या संचालकांची संख्या नऊ असल्यामुळे अध्यक्षपदासाठी या गटाचा दावा प्रबळ ठरु शकतो.

कन्नडची निवडणूक लढणार : नितीन पाटील
कन्नड विधानसभा निवडणुकीची तयारी मी करीतच होतो. मी ही निवडणूक लढणारच आहे. शिंदे गटातच राहणार आहे. गट बदलण्याचा विषयच नाही, अशी प्रतिक्रिया नितीन पाटील यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

बँकेचे एकूण वीस संचालक आहेत. त्यांचे राजकीय बलाबल असे :
शिवसेना शिंदे गट- ९
भाजप- ४
शिवसेना उबाठा- ३
काँग्रेस- २
राष्ट्रवादी अजित पवार गट- १
बीआरएस- १

Web Title: Nitin Patil resigns from the post of District Bank President of Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.