निजामाबाद जिल्हा परिषद टी.आर.एस.च्या ताब्यात
By Admin | Published: May 14, 2014 11:43 PM2014-05-14T23:43:12+5:302014-05-14T23:57:40+5:30
बिलोली : लगतच्या तेलंगणा या नवनिर्मित राज्यातील पालिकापाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली
बिलोली : लगतच्या तेलंगणा या नवनिर्मित राज्यातील पालिकापाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली. यात निजामाबाद जिल्हा परिषदेत टी.आर.एस. पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले तर बोधन पंचायत समिती कॉंग्रेसच्या ताब्यात गेली आहे. निजामाबाद आणि बोधन ही दोन्ही गावे बिलोलीपासून जवळच आहेत. पंचायत समिती निवडणुकीत एमआयएमची जादू मात्र चालली नाही. दरम्यान, ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेनुसार मतदान झाल्याने १३ मे च्या रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आले. येत्या २ जूनपासून मराठवाड्याच्यालगत तेलंगणा हे नवीन राज्य अस्तित्वात येणार आहे. तेलंगणात प्रारंभी पालिकानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. एप्रिलअखेर विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका एकत्रित झाल्या. ११९ विधानसभा आणि १७ लोकसभेच्या जागा असलेल्या तेलंगणाचा पहिला मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होईल?याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. दरम्यान, स्वतंत्र तेलंगणाचा मुद्दा टी.आर.एस.ने प्रारंभी लावून धरला, त्यामुळे सध्या या पक्षाचे वारे आहे. टी.आर.एस.चे संस्थापक चंद्रशेखर राव यांचा मुलगा, मुलगी, दोन जावई व ते स्वत: असे ५ जण वेगवेगळ्या मतदारसंघातून उभे होते. १३ मे रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीची मतमोजणी झाली. निजामाबाद जि.प.तील ३६ पैकी २४ जगा टी.आर.एस.ने मिळविल्या तर १२ जागांवर कॉंग्रेसने विजय प्राप्त केला. बोधन पंचायत समितीच्या १९ जागांपैकी १३ जागांवर कॉंग्रेस, टी.आर.एस. ४, टीडीपी व अपक्ष यांना प्रत्येकी १ जागा मिळाली. ग्रामीण भागात कॉंग्रेस, टी.आर.एस.ने वर्चस्व मिळविल्याने विधानसभा व लोकसभेत कोण बाजी मारतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.(वार्ताहर)