मनपा करणार २०० कोटींची वसुली!
By Admin | Published: April 9, 2016 12:41 AM2016-04-09T00:41:56+5:302016-04-09T00:53:34+5:30
मुजीब देवणीकर, औरंगाबाद महापालिकेने आजपर्यंत नेहमीच तहान लागल्यानंतर विहीर खोदायचे काम केले आहे.
मुजीब देवणीकर, औरंगाबाद
महापालिकेने आजपर्यंत नेहमीच तहान लागल्यानंतर विहीर खोदायचे काम केले आहे. स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द झाल्यानंतर पालिकेने मालमत्ता कर वसुलीवर अधिक भर दिला आहे. मागील १० ते १५ वर्षांमध्ये ज्या मालमत्ताधारकांनी थकबाकी भरलीच नाही, त्यांच्याकडून आता थकबाकी वसूल करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली असून, २०० कोटींहून अधिक रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
मागील तीन दशकांमध्ये मालमत्ता कर वसुलीकडे मनपाने कधीच लक्ष दिले नाही. जकात आणि त्यानंतर एलबीटीच्या माध्यमातून येणाऱ्या पैशांवर मनपाचा कारभार चालत होता. शासनाने एलबीटी कर वसुली बंद केल्यापासून मालमत्ता कर हा सर्वात मोठा आर्थिक स्रोत मानण्यात येत आहे.
दरवर्षी डिसेंबर, जानेवारी महिन्यांत मनपाला मालमत्ता कर वसूल करण्याची आठवण येते. प्रत्येक मालमत्ताधारकाला चालू आर्थिक वर्षाची ‘डिमांड’ पाठविण्यात येते. प्रामाणिकपणे कर भरणारे नागरिक आढेवेढे न घेता कर भरून टाकतात. अनेक मालमत्ताधारक डिमांड नोटीसकडे दुर्लक्ष करतात. मालमत्ताधारकाने थकविलेल्या या रकमेची नोंद मनपा दप्तरी होते. मात्र, थकबाकीची वसुली कधीच होत नाही. थकबाकीचा हा डोंगर वर्षानुवर्षे वाढतच जातो. मागील १५ वर्षांमध्ये मालमत्ताधारकांनी किमान २०० कोटी रुपये थकविल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने बांधला आहे.
प्रत्येक वॉर्ड कार्यालयातील १०० मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही यादी तयार झाल्यावर लगेचच सक्तीने वसुली करण्यात येईल. मालमत्ता सीलही करण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी वसुलीसाठी मायक्रोप्लॅनही तयार केला आहे. मनपाचा आर्थिक कणा मजबूत झाल्यास विकास कामे करता येतील, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. या दृष्टीने प्रशासन वाटचाल करीत आहे. मालमत्ता करासंदर्भात ठोस पाऊलही उचलण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.